कसोटी मालिकेत विंडीजचा 2-0 ने धुव्वा उडवल्यानंतर, आजपासून दोन्ही संघांमध्ये वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात आहे. गुवाहटीच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या ठेवली आहे. शिमरॉन हेटमायरने शतकी खेळी करुन संघाला 300 ची धावसंख्या ओलांडण्यास मदत केली. 50 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात विंडीजने 322 धावांपर्यंत मजल मारुन भारताला विजयासाठी 323 धावांचं आव्हान दिलं. दरम्यान पहिल्या डावाच्या खेळादरम्यान 7 विक्रमांची नोंद करण्यात आली.

200 – विंडीजचा फलंदाज मार्लन सॅम्युअल्सचा हा 200 वा वन-डे सामना ठरला. विंडीजच्या संघाकडून अशी कामगिरी करणारा तो आठवा खेळाडू ठरलाय. सॅम्युअल्स व्यतिरीक्त ब्रायन लारा, ख्रिस गेल, शिवनारायण चंद्रपॉल, डेस्माँड हेन्स, कार्ल हुपर, रिची रिचर्डसन आणि कोल्टर्नी वॉल्श यांनी 200 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.

224 – ऋषभ पंत भारताच्या वन-डे संघाकडून कडून खेळणारा 224 वा खेळाडू ठरला आहे.

8 – आतापर्यंत वन-डे क्रिकेटच्या इतिहासात 8 खेळाडू आपल्या 200 व्या वन-डे सामन्यात शून्यावर बाद झाले आहेत. विंडीजच्या मार्लन सॅम्युअल्सने या यादीमध्ये आपलं नाव निश्चीत केलं आहे.

106 – वन-डे क्रिकेटमधलं शिमरॉन हेटमायरचं हे तिसरं शतक ठरलं. पहिल्या डावात हेटमायरने 106 धावा केल्या. विंडीजकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद तिसरं शतक झळकावणारा खेळाडू हा मान हेटमायरने मिळवला आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. याआधी व्हिव रिचर्ड्स यांनी 16 सामन्यांमध्ये अशी कामगिरी केली होती.

74 – 74 चेंडूंमध्ये हेटमायरने आपलं वन-डे क्रिकेटमधलं तिसरं शतक झळकावलं. वन-डे क्रिकेटमधलं हेटमायरचं हे जलद शतक ठरलं. याआधी युएईविरुद्ध हेटमायरने 78 चेंडूत तर बांगलादेशविरुद्ध 84 चेंडूत शतक झळकावलं होतं.

81 – 10 षटकांमध्ये मोहम्मद शमीने तब्बल 81 धावा दिल्या. वन-डे क्रिकेटमध्ये 80 पेक्षा जास्त धावा देण्याची शमीची ही तिसरी वेळ ठरली.

322/8 – भारताविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये 300 पार धावसंख्या उभारण्याची विंडीजची ही नववी वेळ ठरली. यातील 8 पैकी 5 वेळा विंडीज सामना जिंकली असून 3 वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.