वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल स्पर्धा तातडीने स्थगित करण्यात आली असून बीसीसीआयने यासंबंधी अधिकृत घोषणा केली आहे. स्पर्धा पूर्णपणे रद्द करण्यात आलेली नसून करोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे बीसीसीआयने सांगितले. काही दिवसांनंतर सर्व संबंधितांशी चर्चा करून, उर्वरीत स्पर्धा घेता येईल का, कुठे व कशी घेता येईल आदीची चाचपणी केली जाईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले.

मात्र, इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असताना करोना आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कसा पसरला हा प्रश्न सर्वांना पडला आहे. आयपीएल स्थगित होण्याच्या एक दिवस आधी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात सोमवारी होणारा सामना पुढे ढकलण्यात आला होता. केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वारियर यांना करोनाची लागण झाली. मीडिया रिपोर्टनुसार वरुण चक्रवर्तीच्या बेजबाबदारपणामुळे करोना पसरला असल्याचे सांगण्यात येत आहे.

वरुण चक्रवर्तीमुळे करोना पसरला?

‘स्पोर्ट्स तक’ कडून मिळालेल्या माहितीनुसार, कोपराच्या दुखापतीमुळे वरुण चक्रवर्तीला काही काळापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वरुणने क्वारंटाइन न राहता दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळला होता. या प्रकारामुळे बायो बबलचा फुगा फुटला. त्यानंतर वरुणचा सहकारी संदीप वारियर यालाही करोनाची लागण झाली.

आयपीएलनेही ट्विट करत निवेदन प्रसिद्द केले असून आयपीएल स्थगित करण्याचे कारण सांगितले आहे. “आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेत आयपीएलचा सध्याचा हंगाम तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसंच इतरांच्या सुरक्षेशी बीसीसीआय तडजोड करु इच्छित नाही. भागधारकांची सुरक्षा, आरोग्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला,” असे आयपीएलकडून सांगण्यात आले आहे.