आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागला. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी घातली, तर गुरूनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. या निर्णयामुळे आयपीएलच्या पुढील मोसमांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

१. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघावर घातलेल्या दोन वर्षांच्या बंदीमुळे आयपीएलच्या पुढील मोसमात आठ ऐवजी सहाच संघ खेळतील. त्यानुसारच वेळापत्रक निश्चित करावे लागेल.

२. आयपीएलमधील संघांपैकी धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज संघाची देशात सर्वाधिक लोकप्रियता असल्याचे आयपीएलच्या सर्व्हेतून समोर आले होते. आता चेन्नईवर बंदी घालण्यात आल्याने संघासह आयपीएल स्पर्धेला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

४. चेन्नई आणि राजस्थानचे संघ आयपीएलमध्ये नसल्यामुळे पुढील मोसमात राजस्थानच्या सवाई मानसिंग आणि चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर सामन्यांचे आयोजन टाळले जाण्याचीही शक्यता आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांच्या रोषाला आणि तिकीट विक्रीतील तोट्याला सामोरे जाण्यापेक्षा या दोन्ही स्टेडियमवर पुढील दोन वर्षे आयपीएलचे सामने आयोजित करण्यापासून फारकत घेतली जाऊ शकते.

५. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या संघ मालकांना पुढील दोन वर्षे संघाची मालकी देखील विकता येणार नसल्याचेही न्यायालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षे दोन्ही संघांच्या संघ मालकांना तोट्याला सामोरे जावे लागेल.

६. आयपीएलच्या मागील मोसमांत दमदार कामगिरी करणारा चेन्नई सुपरकिंग्ज संघ चॅम्पियन्स लीगसाठी पात्र झाला आहे. मात्र, लोढा समितीच्या निर्णयानुसार चेन्नईच्या संघावर घालण्यात आलेली बंदी त्वरित लागू झाली असल्याने चॅम्पियन्स लीगमध्येही चेन्नईच्या संघावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.