विश्वचषक स्पर्धेचा सर्वात थरारक अशा अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडने विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी १५-१५ धावा केल्याने सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. या थरारक विजयाबरोबरच इंग्लंडने विश्वचषकाच्या ४४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरले. या विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याचे एक ट्विट पुन्हा चर्चेत आले आहे. वॉनने २७ जून रोजी केलेल्या ट्विटमधील भविष्यवाणी खरी ठरली आहे.

भारतीय संघाने विश्वचषकातील साखळी सामन्यात २७ जून रोजी वेस्ट इंडिज संघाचा १२५ धावांनी धुव्वा उडवला. स्पर्धेमधील भारताचा हा सहा सामन्यांतील पाचवा विजय ठरला होता. पावसामुळे एक सामना अनिर्णित राहिल्याने सहा सामने खेळूनही अजिंक्य राहणारा भारत हा एकमेव संघ होता. विश्वचषकातील भारताच्या धडाकेबाज कामगिरीनंतर अनेक माजी दिग्गजांनी भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचं मत व्यक्त केलं होतं. पाकिस्तान, श्रीलंकेकडून झालेला धक्कादायक पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मात दिल्यापासून इंग्लंडच्या माजी खेळाडूंचे सूर सोशल मीडियावर देखील बदललेले पहायला मिळत होते. इंग्लंडचा साखळी फेरीत बिघडलेली कामगिरी आणि भारताची अजिंक्य घौडदौड लक्षात घेऊन भारत इंग्लंड सामन्याआधीच्या सामन्यानंतर मायकल वॉनने एक ट्विट केलं होतं. भारताची स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरी पाहून वॉनने विश्वचषक जिंकू शकतो असं थेट म्हणणं वॉनने टाळलं होतं तरी तशा आशयाचं एक ट्विट मात्र नक्की केलं होतं. ‘जो संघ भारताला पराभूत करेल तोच संघ हा वर्ल्डकप जिंकेल’, असं ट्विट त्याने भारताने विंडिजचा पराभव केल्यानंतर केलं होतं. ट्विटरद्वारे सातत्याने मायकल वॉन भारतीय संघावर आणि संघातील खेळाडूंवर निशाणा साधत असतो किंवा टीका करतो, त्यामुळे त्याने केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडिया युजर्सकडून त्याची खिल्ली उडवली जात होती.

…आणि भविष्यवाणी खरी ठरली

मात्र २७ जून रोजी वॉनने हे ट्विट केले आणि ३० जून रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये इंग्लंडने अजिंक्य राहिलेल्या भारतीय संघाचा ३१ धावांनी पराभव केला. त्यानंतर साखळी फेरी संपली तेव्हा गुणतालिकेमध्ये भारत पहिल्या स्थानी, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी, इंग्लंड तिसऱ्या स्थानी आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानी होते. पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये भारताचा न्यूझीलंडने १८ धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा जवळजवळ २० षटके बाकी ठेवत ८ गडी राखून विजय मिळवला. अखेर रविवारी लॉर्ड्सवर पार पडलेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही २४१ धावा केल्याने सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरच्या माध्यमातून लावण्यात आला. मात्र सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी १५ धावा केल्याने सामन्यामध्ये सर्वाधिक चौकार-षटकार लगावणाऱ्या संघाला विश्वविजेता घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे उपांत्य फेरीत प्रवेश करताना न्यूझीलंडनेही भारताचा पराभव केल्याने कोणताही संघ जिंकला असता तरी वॉनची भविष्यवाणी काही प्रमाणात खरीच ठरली असती. मात्र पहिल्यांदा भारताचा पराभव करणाऱ्या इंग्लंडनेच विश्वचषकावर नाव कोरल्याने वॉनचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असं म्हणता येईल.