देशात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका आता क्रीडा स्पर्धांनाही बसायला लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा आणि आयपीएल स्पर्धा करोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा आता १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे. मात्र सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धा पूर्णपणे रद्द करणं बीसीसीआयला परवडणारं नाही, तज्ज्ञ व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय, संघमालक आणि सामन्यांचं थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीला अंदाजे ३ हजार कोटींचा फटका बसू शकतो.

केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून १५ एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांसाठी व्हिसाचे नियम कठोर केले आहेत. त्यामुळे कोणताही परदेशी खेळाडू १५ एप्रिलपर्यंत आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकणार नव्हता. काही संघमालक, आयपीएल सामने प्रेक्षकांविना खेळवण्यासाठी तयार असल्याचंही कळतंय. काही दिवसांपूर्वी अनेक राज्यांनी आयपीएलचे सामने पुढे ढकलावेत यासाठी केंद्र सरकारला विनंती केली होती. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता आयपीएल सामने न खेळवण्याचा निर्णय घेतला.

“आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास, संघातील समभागधारकांना किमान साडेतीन हजार कोटींचा फटका बसू शकतो. याचसोबत प्रत्येक संघमालकाला बीसीसीआयकडून मिळणाऱ्या १०० कोटींच्या निधीवरही पाणी सोडावं लागू शकतं”, आयपीएलच्या एका संघातील अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला ही माहिती दिली. याव्यतिरीक्त बीसीसीआयला होणाऱ्या आर्थिक नुकसानाचा आकडाही मोठा असणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बीसीसीआयला दोन हजार कोटींचा फटका बसण्याचा अंदाज आहे. याव्यतिरीक्त सामन्याचं प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीकडून मिळणाऱ्या ३ हजार कोटींवरही बीसीसीआयला पाणी सोडावं लागेल. याव्यतिरीक्त आयपीएलचं प्रायोजकत्व स्विकारलेल्या विवो ही मोबाईल फोन कंपनी प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला ५०० कोटींचा निधी देते. तसेच प्रत्येक संघमालकांना त्यांच्या संघासाठी मिळणाऱ्या प्रायोजकांकडून प्रत्येक वर्षी अंदाजे ३५ ते ७५ कोटींच्या घरात रक्कम मिळते, या रकमेवरही पाणी सोडावं लागू शकतं.

आर्थिक नुकसानासोबतच अनेक व्यक्तींच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. आयपीएलमधील ८ संघात अंदाजे ६०० लोकं ही कायमस्वरुपी किंवा कंत्राटी पद्धतीवर काम करतात. त्यामुळे यंदाच्या हंगामात आयपीएल रद्द झालं तर अनेकांची नोकरीही धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल १५ एप्रिलपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर इतर पर्यायांचा विचार करत आहे. अनेक संघांनी आपली सरावसत्रही करोनामुळे रद्द केली आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.