मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने IPL मध्ये मुंबईचे दीर्घ काळापासून प्रतिनिधित्व केले आहे. २०११ साली रोहित मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू बनला. त्यानंतर त्याने २०१३ मध्ये संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आणि अजूनही तो कर्णधारपदाची जबाबदारी व्यवस्थित सांभाळतो आहे. IPL मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चार वेळा विजेतेपदांवर नाव कोरले. २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ अशी सर्वाधिक चार विजेतेपदे मुंबईकडे आहेत. रोहितकडे कर्णधारपद आल्यापासून मुंबईच्या संघाला चांगले दिवस आले. पण रोहित हा एक यशस्वी कर्णधार का आहे? यामागचं कारण माजी खेळाडू इरफान पठाणने सांगितले.

इरफान पठाणने नुकताच क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. त्यावेळी त्याने रोहित शर्मा आणि मुंबईचा माजी रणजी खेळाडू वसीम जाफर यांची तुलना केली. “मैदानात एखादा खेळाडू काहीसा शांत आणि आरामात दिसला, की लोक लगेच त्याला सुधारणा करण्याचा सल्ला द्यायला सुरूवात करतात. रोहितच्या बाबतीतदेखील हे अनेकदा घडलं आहे. असेच सल्ले क्रिकेट जाणकारांनी वसीम जाफरच्या काळात त्याला दिले होते. कारण तो मैदानावर खूप हळू धावायचा. पण प्रत्यक्षात त्याच्या फलंदाजीने साऱ्यांना गप्प केले. लोकं त्याला सल्ले द्यायचे, त्यावेळी तो स्वत:मध्ये सुधारणा करतच होता”, असे पठाण म्हणाला.

“वसीम जाफरबाबत जे झालं, तेच रोहितबाबत होताना दिसत आहे. कदाचित रोहित स्वत: खूप परिश्रम घेत असेल, स्वत:ला अजून तंदुरूस्त करत असेल, पण तो तुम्हाला ते सारं सांगत नसेल. रोहित ज्यावेळी काहीही बोलतो, तेव्हा तो महत्त्वाच्या विषयांवर बोलतो. तो त्याच्या संघाबद्दल कायम बोलत असतो. म्हणूनच तो एक यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सला मिळालेली विजेतेपदं ही त्याच्या चांगल्या नेतृत्वशैलीची पावती आहे”, असे पठाणने सांगितले.