सिमोन हालेप, अँजेलिक कर्बर आणि मारिन चिलीच यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी आगेकूच केली. पाचव्या मानांकित सिमोनने नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सवर ६-४, ६-३ अशी सरळ सेट्समध्ये मात करत चौथ्या फेरीत आगेकूच केली.

डब्ल्यूटीए स्पर्धाची १२ जेतेपदे नावावर असलेल्या सिमोनला कारकीर्दीत एकदाही ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकावता आलेले नाही. २०१४ मध्ये सिमोनने विम्बल्डन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीपर्यंत मजल मारली होती. ही कामगिरी सुधारण्यासाठी सिमोन प्रयत्नशील आहे. यंदाच्या वर्षांत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या अँजेलिक कर्बरने जर्मनीच्या कॅरिना विथोइफ्टवर ७-६ (१३-११), ६-१ असा विजय मिळवत चौथी फेरी गाठली. स्लोअन स्टीफन्सने मँडी मिनेलावर ३-६, ७-६ (८-६), ८-६ अशी मात केली. तिमेआ बॅझिनस्कीने मोनिका निक्यूलेस्यूचा ४-६, ६-२, ६-१ असा पराभव केला.

पुरुषांमध्ये मारिन चिलीचने ल्युकास लाकोला ६-३, ६-३, ६-४ असे नमवले. अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर असणाऱ्या चिलीचला गेल्या वर्षभरात दुखापतींनी सतावले आहे. निकोलस माहुतने पिआर ह्य़ुज हरबर्टवर ७-६ (७-५), ६-४, ३-६, ६-३ अशी मात केली.