भारतीय खेळाडू सध्या युएईत आयपीएलचा तेरावा हंगाम खेळत आहेत. १० नोव्हेंबरला अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होती. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ वन-डे आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. मात्र आयपीएल सामन्यांदरम्यान भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांना झालेली दुखापत आणि हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसल्यामुळे भारतीय संघाची निवड समिती नवदीप सैनीला कसोटी मालिकेत संघात स्थान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरलेला हार्दिक पांड्या सध्या गोलंदाजी करत नाहीये. तर इशांत आणि भुवनेश्वर दुखापतीमूळे पुढचे काही दिवस खेळू शकणार नाहीयेत.

“हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेटमध्ये पूर्वीसारखी गोलंदाजी करु शकणार नाही, कारण त्याचं शरीर त्याला साथ देत नाहीये. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा गोलंदाज म्हणून वापर होऊ शकतो. त्यामुळे नवदीप सैनी हा एक पर्याय आमच्याकडे उरतोय.” BCCI मधील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या आयपीएल सामन्यांमध्ये गोलंदाजी करत नसला तरीही तो नेट्समध्ये झहीर खानच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शैलीत बदल घडवता येईल का यावर काम करतो आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये हार्दिकवर गोलंदाजीचा भार टाकण्यास निवड समिती तयार नसल्याचं समजतंय.

अशा परिस्थिती नवदीप सैनीला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळू शकते. याआधी भारतीय संघाकडून वन-डे आणि टी-२० सामने खेळताना नवदीपने आपल्या भेदक माऱ्याने सर्वांना प्रभावित केलं आहे. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने अद्याप दौऱ्याचा कार्यक्रम निश्चीत केलेला नसल्यामुळे, निवड समितीने संघ निवडीची बैठक घेतलेली नसल्याचं समजतंय. आयपीएलचा तेरावा हंगाम संपल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू दुबईवरुन ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.