सायना नेहवालच्या यशानंतर भारतीय बॅडमिंटनला खऱ्या अर्थाने झळाळी मिळाली. सायनाच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनासह ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा, पी. व्ही. सिंधू या महिला बॅडमिंटनपटूंच्या यशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकला. मात्र आगामी इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धे (आयबीएल)ची संरचना पाहता महिला बॅडमिंटनपटूंवर दुजाभाव झाल्याचे चित्र आहे. या लीगसाठी ‘आयकॉन’ खेळाडूंचा दर्जा लाभलेल्या सहा खेळाडूंमध्ये चार भारतीय महिलांचा समावेश आहे. मात्र ‘आयबीएल’च्या रचनेनुसार पुरुष एकेरीचे दोन, पुरुष दुहेरीचा एक, महिला एकेरीचा एक आणि एक मिश्र दुहेरीचा सामना होणार आहे. यामध्ये महिला दुहेरी हा प्रकार पूर्णत: वगळण्यात आला आहे. याचप्रमाणे पुरुष एकेरीसाठी दोन सामने तर महिला एकेरीसाठी एकच सामना देण्यात आला आहे. भारतीय बॅडमिंटन म्हटले की सायना, पी. व्ही. सिंधू, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा अशा महिला बॅडमिंटनपटूच सध्या प्रामुख्याने डोळ्यांसमोर येतात. पुरुषांमध्ये भारताची मदार एकटय़ा पी. कश्यपवर असते. या पाश्र्वभूमीवर भारतीय बॅडमिंटनच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये ‘सावित्रीच्या लेकी’ उपेक्षितच राहणार आहेत.
सायना नेहवाल या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. मात्र महिला दुहेरीतील तिच्या सहकाऱ्यांना केवळ मिश्र दुहेरीत खेळण्यावरच समाधान मानावे लागणार आहे. इंडियन बॅडमिंटन लीग ही सुदिरमान चषकाच्या धर्तीवर खेळवण्यार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले होते. परंतु सुदिरमान चषक स्पध्रेतत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा पाच प्रकारांत सामने होतात. त्यामुळे पुरुष आणि महिला या दोन्ही खेळाडूंना समसमान न्याय देण्यात आला आहे. मात्र आयबीएलमधून ‘महिला दुहेरी’ या प्रकारालाच वगळण्यात आले आहे.  
सायनाने गेल्या वर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची किमया केली. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत ती तिसऱ्या तर सिंधू १२व्या स्थानी आहे. लोकप्रिय आणि जिंकण्यासाठी दावेदार असणाऱ्या खेळाडूंची महिला दुहेरीतील अनुपलब्धता आणि प्रत्येक लढतीत भारतीय खेळाडूंना स्थान मिळेल, असा विचार करून आयबीएलने व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाने ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, प्रज्ञा गद्रे या बॅडमिंटनपटूंना फक्त मिश्र दुहेरीतच आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या खेळाडूंना बऱ्याच सामन्यांमध्ये केवळ प्रेक्षकाची भूमिका निभावावी लागणार आहे. एकेरीचे खेळाडू दुहेरीत खेळत नाही, तसेच दुहेरीतील खेळाडू एकेरीत सहभागी होताना दिसत नाहीत. त्यामुळे बहुचर्चित आयबीएलचा हिस्सा असूनही आपल्या हक्काच्या प्रकारात या महिला खेळाडूंना खेळताच येणार नाही.
महिला दुहेरीच्या भारतीय क्रमवारीत सध्या असंख्य युवा, उदयोन्मुख महिला खेळाडू आहेत. कनिष्ठ पातळीवर त्यांची कामगिरी चांगली होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या दर्जासाठी त्यांना थोडा कालावधी लागेल. परंतु एकच सामना खेळावा लागणार असल्यामुळे महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याऐवजी त्यांच्या पदरी निराशाच पडणार आहे. जागतिक क्रमवारीत अश्विनी पोनप्पा-प्रज्ञा गद्रे जोडी २७व्या तर अपर्णा बालन-एन. सिक्की रेड्डी जोडी ४६व्या स्थानी आहे. क्रमवारीत आगेकूच करण्यासाठी ही स्पर्धा योग्य व्यासपीठ ठरेल, ही शक्यता अजब रचनेमुळे धुसर झाली आहे.

महिला एकेरीचे दोन सामने असते तर चांगले झाले असते. महिला एकेरीत अनेक अव्वल खेळाडू आहेत. प्रेक्षकांनाही ते बघायला आवडतील.
– श्रीकांत वाड, प्रशिक्षक

महिला दुहेरी हा प्रकार प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा नाही. दुहेरी म्हटले की खेळाडू वाढतात. खर्च वाढतो, अर्थकारण सांभाळण्याचे आव्हान संयोजकांसमोर असू शकते.
– उदय पवार, प्रशिक्षक

पुरुषांचे सामने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, थरारक खेळ पाहायला मिळतो. दूरचित्रवाणी प्रक्षेपण, गर्दी या सगळ्यांचा विचार करुन संयोजकांनी हा निर्णय घेतला असावा.
– मनोहर गोडसे, प्रशिक्षक