|| सुप्रिया दाबके

मुंबई : सध्या पुण्यात सुरू असलेल्या पुरुषांच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात असला तरी महिलांच्या स्पर्धेची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. मात्र कोल्हापूर, पुण्यातून कुस्तीकडे वळणाऱ्या मुलींच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. पुरुषांप्रमाणेच राज्यातील महिलादेखील मोठय़ा प्रमाणात कुस्तीमध्ये कारकीर्द घडवण्याचा गांभीर्याने विचार करीत आहेत.

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेला १९६१ पासून सुरुवात झाल्यानंतर दरवर्षी या स्पर्धेच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली. पुरुषांच्या कुस्तीप्रमाणे आता महिलांचीही कुस्तीही तितकीच जोर धरत आहे. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला दोनच पदके मिळाली. त्या दोन पदकांमधील एक पदक महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने जिंकून दिले. त्यावरून देशातील महिला कुस्तीला नवसंजीवनी मिळाली. गेली काही वर्षे सुरू असणाऱ्या प्रो कुस्ती लीगमध्ये महिलांनाही समाविष्ट करून घेण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला बऱ्यापैकी प्रेक्षकांचे प्रोत्साहनही लाभले. मात्र तरीही महिलांसाठी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा अजून स्वतंत्रपणे सुरू झालेली नाही.

महिलांसाठी होणाऱ्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत जवळपास ५५० मुलींचा सहभाग असतो. मात्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ही पुरुषांसाठीही असते. म्हणजेच पुरुषांसाठी दोन मानाच्या कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रात होतात. एकीकडे मुलींच्या कुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात पुढाकार घेण्यात येत असल्याचे कुस्ती संघटना आणि कुस्ती प्रशिक्षक सांगतात. मात्र दुसरीकडे ‘महाराष्ट्र केसरी’ पासून महिलांना दूर ठेवले जाते, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

‘महाराष्ट्र केसरी’ मुलींसाठी होत नाही, हे चांगलेच आहे. कारण ही गदा मिळाली की पुरुष कुस्तीपटू समाधान मानतात. आपल्याला फक्त ‘केसरी’च्या गदेवरच समाधान मानायचे नसून ऑलिम्पिक पदकांची तयारी करायची आहे. अभिजीत कटके सोडला तर अन्य कोणताही पुरुष कुस्तीपटू ही गदा मिळवल्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवण्याच्या दृष्टीने तयारी करताना दिसत नाही. मुलींकडून आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि ऑलिम्पिकमध्ये पदके हवी आहेत. – दिनेश गुंड, महिला कुस्ती प्रशिक्षक. 

महाराष्ट्र केसरी ही मुलींसाठी नसते. मुलींसाठी अन्य कुस्ती स्पर्धा असतात. त्यातच हरियाणा, दिल्ली या ठिकाणी मुलींची कुस्ती मोठय़ा प्रमाणात होत आहे. मात्र आता राज्यातही कुस्तीकडे येणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे. मला अनेक पालकांचे फोन येतात आणि मुलीला कुस्ती शिकविण्यासाठी कुठे पाठवू म्हणून विचारतात. फक्त खेडय़ातूनच नव्हे तर सुशिक्षित पालकही मुलींना कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. राज्यात कोल्हापूरच्या मुलींचा कुस्तीतील सहभाग सर्वात मोठा आहे. – रेश्मा माने, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू