ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौर ने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने महिलांच्या आशिया चषक स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने कझाकस्तानचा ७-१ असा पराभव करत स्पर्धेत आपला विजयी फॉर्म कायम राखला आहे. भारताकडून गुरजित कौरने ४, ४२ आणि ५६ व्या मिनीटाला गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याव्यतिरीक्त नवनीत कौरने ( २२ व २७ वे मिनीट) आणि दीप ग्रेसने ( १६ व ४१ वे मिनीट) भारताकडून गोल केले.

साखळी फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या भारताला या सामन्यात सुरुवातीच्या सत्रातच मोठा धक्का बसला. सामन्याच्या पहिल्या सत्रात दुसऱ्या मिनीटाला कझाकिस्तानने गोल करत आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र या आक्रमणामुळे दबून न जाता भारतीय महिलांनी पेनल्टी कॉर्नरच्या संघी तयार करुन कझाकिस्तानला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. भारतीय महिलांच्या या युक्तीचा मैदानात चांगलाच फायदा होताना दिसला. १-० अशा पिछाडीवरुन अवघ्या काही मिनीटांमध्येच भारताने सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली.

यानंतर भारतीय महिलांनी ठराविक अंतराने गोल करण्याचा सपाटा लावत सामन्यात ७-१ अशी भक्कम आघाडी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आता भारतीय संघ आगामी सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – Womens Asia Cup Hockey – भारताची विजयाची हॅटट्रिक, मलेशियावर २-० ने मात