पुढील वर्षी होणाऱ्या महिला आशिया चषक फुटबॉल स्पध्रेचे सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. आशियाई फुटबॉल महासंघाने प्रवासाच्या वेळेची बचत आणि जैवसुरक्षित वातावरणाच्या उद्देशाने भुवनेश्वर आणि अहमदाबादला वगळले आहे.

महिला आशिया चषक स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत होणार आहे. या स्पध्रेसाठी मुंबईच्या अंधेरी क्रीडा संकुलातील दी मुंबई फुटबॉल एरिना, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल या नव्या तीन ठिकाणांवर शिक्कामोर्तब केले आहे. ‘‘करोना साथीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे आशियाई फुटबॉल महासंघाने म्हटले आहे. याआधी ही स्पर्धा ओदिशा आणि गुजरातमध्ये होणार होती.

जपान, ऑस्ट्रेलिया, चीन आणि यजमान भारत यांचे स्पध्रेतील स्थान निश्चित झाले आहे. परंतु उर्वरित आठ संघांसाठी पात्रता सामने होणार आहेत. तीन वेळा विजेता चायनीज तैपेई, बहारिन, तुर्केमेनिस्तान यांचा ‘अ’ गटात, तर व्हिएटनाम, ताजिकिस्तान, मालदीव आणि अफगाणिस्तान यांचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. ‘क’ गटात कोरिया, सिंगापूर, इराक आणि इंडोनेशिया तसेच ‘ड’ गटात संयुक्त अरब अमिराती, लेबानॉन , म्यानमान यांचा समावेश आहे.

करोनाच्या साथीमुळे जैवसुरक्षित परीघ निर्मितीसाठी आम्ही मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याची निवड केली आहे. भौगोलिकदृष्टय़ा हे स्टेडियम जवळ आहेत. तसेच या स्टेडियमवर याआधी मोठय़ा फुटबॉल स्पर्धाचे सामने झाले आहेत.

– प्रफुल पटेल, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष