फिफा विश्वचषक स्पर्धा ऐन तोंडावर आली असताना संयोजकांना मात्र विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अद्याप तीन स्टेडियम्सचे काम पूर्ण व्हायचे बाकी असून आता भुयारी मार्गाचे काम करणाऱ्या कामगारांनी संप पुकारल्यामुळे विश्वचषकाच्या तयारीला मोठा फटका बसला आहे.
ब्राझीलची आर्थिक राजधानी असलेल्या साव पावलोमध्ये जाण्यासाठी मेट्रो ट्रेन हीच दळणवळणाची मुख्य सुविधा आहे. येथील स्टेडियमवर विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा आणि १२ जूनला सलामीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे सर्व काही सुरळीत व्हावे, यासाठी संयोजकांच्या डोक्याचा ताप वाढला आहे.
पगार वाढीसंदर्भातली बोलणी फिस्कटल्यामुळे हे कामगार गुरुवार रात्रीपासून संपावर गेले. १० टक्के पगारवाढीची मागणी केली असता, ८.७ टक्के पगारवाढीचे आश्वासन त्यांनी फेटाळून लावले. जर जनतेचा पैसा स्टेडियम उभारणीसाठी वापरण्यात येत असेल तर सार्वजनिक दळणवळणाच्या सेवांसाठी का नये, असा सवाल कामगार युनियनचे अध्यक्ष अल्टिनो मेलो डोस प्रेझेरेस यांनी केला आहे. या संपाचा फटका ४.५ दशलक्ष प्रवाशांना बसणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकासाठी साव पावलो स्टेडियमवर हजर राहणाऱ्या परदेशी प्रवाशांनाही बसणार आहे.