महासंघाकडून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू पुढील आठवडय़ात स्वित्र्झलडमधील बसेल येथे रंगणाऱ्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत एकमेकींशी भिडणार आहेत. जागतिक बॅडमिंटन महासंघाने या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या वेळापत्रकात बदल केल्यामुळे सायना आणि सिंधूचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.

‘‘काही खेळाडूंना चुकून महिला एकेरीच्या वेळापत्रकात स्थान देण्यात आले होते. ही चूक लक्षात आल्यानंतर महिला एकेरीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे,’’ असे जागतिक बॅडमिंटन महासंघाने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे. सायना आणि सिंधूने प्राथमिक फेऱ्यांचा अडथळा पार करत उपांत्य फेरीत मजल मारली तर भारताच्या या दोन अव्वल खेळाडूंमध्येच उपांत्य लढत रंगणार आहे.

जागतिक स्पर्धेत दोन वेळा रौप्यपदकावर नाव कोरणाऱ्या सिंधूला पाचवे मानांकन मिळाले असून पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. त्यानंतर सिंधूचा सामना चायनीज तैपेईची पै यू पो किंवा बल्गेरियाच्या लिंडा झेटचिरी यांच्यामधील विजेत्याशी होणार आहे. सिंधूसमोर तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बेईवेन झँग हिचे आव्हान असण्याची शक्यता आहे.

आठव्या मानांकित सायनालाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून तिला दुसऱ्या फेरीत स्वित्र्झलडची सॅबरिना जॅकेट आणि नेदरलँड्सची सोराया डे विच इजबेरगेन यांच्यातील विजेतीशी सामना करावा लागेल. सायनाला तिसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

केटच्या बंदीचा जागतिक महासंघाला विसर

जागतिक महासंघाने वेळापत्रकात बदल का केला, याचे कोणतेही कारण दिले नाही. मात्र प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, महासंघाने अजाणतेपणाने मॉरिशसच्या केट फू कुने हिला महिला एकेरीत स्थान दिले होते. केट हिच्यावर उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे जुलै महिन्यापासून बंदी असल्याचा विसर जागतिक महासंघाला पडला होता. म्हणूनच वेळापत्रकात बदल करण्यात आले. पुरुष एकेरी, महिला दुहेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या चार प्रकारांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.