विश्वचषक स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या कालावधीत सर्वच संघ कसून तयारी करत आहेत. लवकरच सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल होणार आहेत. भारताच्या संघात १५ खेळाडूंची निवड झाली असून दुखापतीने ग्रस्त असलेला केदार जाधव देखील विश्वचषकासाठी फिट असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे १५ एप्रिलला जाहीर करण्यात आलेल्या संघात कोणताही बदल न करता संघ इंग्लंडला जाणार आहे.

या संघात ऋषभ पंत याला संधी देण्यात यावी अशी मागणी होती. मात्र महेंद्रसिंग धोनी याच्या बरोबर राखीव यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक याची निवड करण्यात करण्यात आली आहे. धोनी अजूनही तंदुरुस्त आहे. त्याने IPL मध्ये आपली चमक दाखवली आहे. यष्ट्यांमागे चपळाईने झेल टिपणे आणि यष्टीचीत करणे यामध्ये धोनीचा हात कोणीच धरू शकत नाही. पण विश्वचषक स्पर्धेत गडी बाद करण्याच्या बाबतीत धोनी हा नंबर १ नाही. विश्वचषकात यष्ट्यांमागे गडी बाद करण्याच्या बाबतीत असलेले ‘टॉप ५’ यष्टीरक्षक –

कुमार संगकारा – श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक ठरला आहे. त्याच्या खात्यात आतापर्यंत ३७ सामन्यांत ५४ गडी आहेत. यात ४१ झेल आणि १३ यष्टिचीत आहेत.

ऍडम गिलख्रिस्ट – ऑस्ट्रेलियाचा निवृत्त तडाखेबाज खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट हा विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी यष्टीरक्षक आहे. त्याने ३१ सामन्यात ५२ गडी बाद केले आहेत. यापैकी ४५ झेलबाद असून ७ गडी यष्टिचीत आहेत.

महेंद्रसिंग धोनी – भारताचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याने २० सामन्यात यष्ट्यामागून ३२ गडी माघारी पाठवले आहेत. यात २७ झेल आणि ५ यष्टिचीत खेळाडू आहेत. धोनी या यादीत तिसरा असला तरी संगकारा आणि गिलख्रिस्ट या दोघांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असल्याने धोनीला या विश्वचषकात चांगली कामगिरी करून सर्वोत्तम ठरण्याची आणि या यादीत अव्वल ठरण्याची संधी आहे.

ब्रेंडन मॅक्क्युलम – न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम हा देखील धोनीसह ३२ गडी बाद करून संयुक्त तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ३० गडी झेलबाद केले असून २ गडी यष्टिचीत बाद केले आहेत.

मार्क बाऊचर – दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू मार्क बाऊचर याने याने २५ सामन्यात यष्टिरक्षक म्हणून ३१ बळी टिपले आहेत. बाऊचरने १९९९, २००३ आणि २००७ अशा ३ विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत.