भारताच्या सुनीलद्युत नारायण याने जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत अनपेक्षित विजयाची मालिका कायम राखताना पाचव्या फेरीत बल्गेरियाचा ग्रँडमास्टर व्लादिस्लाव्ह कोवालीव्हवर सनसनाटी विजय मिळविला. मुलींमध्ये भारताच्या पी.व्ही.नंदिताने आश्चर्यजनक विजय मिळवीत पद्मिनी राऊत व इव्हाना फुर्टाडो यांच्या साथीने संयुक्त आघाडी घेतली आहे.
हॉटेल हयात येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील पाचव्या फेरीअखेर सुनीलने जॉर्ज कोरी (पेरू), लु शांगलेई (चीन) यांच्या साथीने संयुक्त आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रत्येकी साडेचार गुण झाले आहेत. भारताच्या सहज ग्रोव्हरसह आठ खेळाडूंनी प्रत्येकी चार गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. मुलींमध्ये नंदिता, पद्मिनी, इव्हाना या भारतीय खेळाडूंसह दहा खेळाडूंनी प्रत्येकी चार गुणांनिशी संयुक्त आघाडी घेतली आहे.
सुनीलने कोवालीव्हचा ५६ चालींमध्ये पराभव केला. सुनीलपेक्षा कोवालीव्ह हा मानांकन गुणात १२८ गुणांनी पुढे आहे, तरीही सुनीलने कोणतेही दडपण न घेता हा डाव क्वीन्स गॅम्बिट तंत्राचा उपयोग करीतजिंकला. जॉर्जला चीनच्या वेई येई याने बरोबरीत रोखले. शांगलेई याने अर्मेनियाच्या कॅरेन ग्रिगोरियान याच्यावर विजय मिळविला. भारताच्या विदित गुजराथीला श्रीनाथ नारायण याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली.
मुलींमध्ये नंदिताने मेरीविरुद्ध ४८ चालींमध्ये बहारदार विजय मिळविला. तिने डावाच्या मध्यास कल्पक डावपेच करीत नियंत्रण मिळविले.  पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर मेरीने डाव सोडून दिला. पद्मिनीने इराणच्या सारस्दात खादेमलाशेरीविरुद्ध बरोबरी स्वीकारली.
अन्य काही निकाल
*बेंजामिन बोक (नेदरलँड्स) वि.वि. शार्दूल गागरे (भारत), अंकित राजपारा (भारत) बरोबरी वि. निरंजन नवलगुंद (भारत), सहज ग्रोव्हर (भारत) वि. वि. गॅब्रियल गेव्हीलर (स्वित्र्झलड)
*मुली : आर.वैशाली (भारत) वि.वि. नेई शिक्वेन (चीन), ऋचा पुजारी (भारत) बरोबरी वि. व्हेर्गा क्लारा (हंगेरी), तारिणी गोयल (भारत) बरोबरी वि. मोना खलीद (इजिप्त), जी.के.मनीषा (भारत) वि.वि. मारिया जेव्होर्जियान (अर्मेनिया), साक्षी चितलांग (भारत) पराभूत वि. मेई फ्रेना (फिलीपाइन्स).