जागतिक बुद्धिबळ महासंघातर्फे चाँगिंग, चीनमध्ये आयोजित केलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत नगरच्या शार्दूल गागरेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुवर्णपदकाची कमाई केली. मातब्बर म्हणून गणल्या जाणाऱ्या रशियाचाही भारताच्या युवा खेळाडूंनी सातव्या फेरीअखेर पराभव केला, तर अंतिम फेरीत इराणच्या संघाला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. नुकत्याच झालेल्या स्पेनमधील स्पर्धेत शार्दूलने ग्रँडमास्टर किताबाचा पहिला निकष पूर्ण केला आहे.
स्पर्धेत भारतीय संघाने १८ गुण मिळवत सुवर्ण, रशियाने १७ गुण मिळवत रौप्य तर तुर्कस्तानने १५ गुण मिळवत कांस्य पदक पटकावले. चीनमध्ये या स्पर्धा २१ ते २९ जुलै दरम्यान झाल्या. भारतीय संघात मुरली कार्तिकेयन, दिप्त्यान घोष, सायनतन दास यांचा समावेश होता. स्पेनमधील स्पर्धेत ग्रँडमास्टर किताबाचे पहिले मानांकन मिळवताना शार्दूलचे मानांकन २२४३ झाले होते, आता चीनमधील विजयामुळे त्याचे मानांकन २४५५ झाले आहे.