दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या वृद्धिमान साहाने बुधवारी धडाकेबाज कामगिरी केली. सय्यद मुश्ताक अली टी २० स्पर्धेत बंगालकडून खेळताना साहाने झंझावाती शतक ठोकले. त्याच्या खेळीच्या जोरावर बंगालने सामना १०७ धावांनी जिंकला.

साहाने ६२ चेंडूंमध्ये १२९ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीत त्याने १६ चौकार आणि ४ षटकार लगावले. कायम संयमी खेळी करणाऱ्या साहाने झकास खेळी करत चक्क २०८ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली.

वृद्धिमान साहा

 

बंगालने अरुणाचल प्रदेशपुढे प्रथम फलंदाजी करत २३५ धावांचे लक्ष्य ठेवले. साहाव्यतिरिक्त विवेक सिंग याने केवळ १८ चेंडूत ४९ धावा तडकावल्या आणि बंगालला ६ बाद २३४ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना अरुणाचल प्रदेशने केवळ ४ बाद १२७ एवढीच धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून क्षितिज शर्मा याने नाबाद ५४ धावा करत बाजू धरून ठेवली, पण त्याचे प्रयत्न खूपच तोकडे पडले.