वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने त्यांच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये एकाही फिरकीपटूला स्थान दिले नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने सोशल मीडियावर ट्वीट करुन आश्चर्य व्यक्त केले. वॉर्नने आपल्या ट्वीटमध्ये न्यूझीलंडच्या निर्णयाला धक्कादायक म्हटले आहे. ”आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी फायनल) अंतिम सामन्यात न्यूझीलंडने कोणत्याही फिरकीपटूला संधी दिली नाही, हे पाहून मी खूप निराश झालो. या विकेटवर चेंडू खूप जास्त वळेल, कारण पाऊलखुणा आधीच झाल्या आहेत. खेळपट्टी फिरकीला पोषक ठरली, तर भारतीय संघ २७५ किंवा ३०० पेक्षा जास्त धावा करू शकेल. जर पावसाने व्यत्यय आणला नाही, तर सामना संपलेला असेल”, असे वॉर्नने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते.

शेन वॉर्नच्या या ट्वीटवर चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. इतकेच नव्हे, तर एका क्रिकेट चाहत्याने कसोटीत ७०८ बळी घेणाऱ्या वॉर्नच्या ट्वीटची खिल्ली उडविली. ”फिरकी गोलंदाजी कशी कार्य करते हे तुम्हाला माहीत आहे का? खेळपट्टी कोरडी राहिल्यावर फिरकी काम करते. पण साऊथम्प्टनमध्ये पाऊस पडत आहे, त्यामुळे खेळपट्टी ओली आहे”, असे एका चाहत्याने वॉर्नला ट्वीट करत सांगितले.

हेही वाचा – क्रिकेटमधून निवृत्त होऊन ८ वर्ष झाली, तरीही सचिनचा ‘जलवा’ कायम!

या ट्वीटवर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने वॉर्नची मजा घेतली. त्याने वॉर्न आणि या चाहत्याचे ट्वीट रिट्वीट करत म्हटले, ”वॉर्न, ही प्रतिक्रिया फ्रेम करून ठेव आणि फिरकी गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न कर.” सेहवागची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.

 

उपाहारापर्यंत भारत (तिसरा दिवस)

भारताने तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत ८९ षटकात ७ बाद २११ धावा केल्या आहेत. या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने ६५ धावा करत ४ गडी गमावले. रवींद्र जडेजा १५ तर इशांत शर्मा २ धावांवर नाबाद आहे. भारताने आज ३ बाद १४६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. खेळ सुरू होताच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने भारतीय कर्णधार विराट कोहलीला पायचित पकडले. विराट हा जेमीसनचा दुसरा बळी ठरला. विराटने ४४ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर भारताला ऋषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तिखट मारा करणाऱ्या जेमीसनने त्याला लॅथमकरवी झेलबाद केले. पंत ४ धावा काढून माघारी परतला. विराटनंतर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले. वेगवान गोलंदाज नील वॅगनरने त्याला लॅथमकरवी वैयक्तिक ४९ धावांवर बाद केले. त्यानंतर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भारताला दोनशेपार पोहोचवले. चांगल्या लयीत असलेला अश्विन टिम साऊदीचा बळी ठरला. ३ चौकारांसह २२ धावांची खेळी केल्यानंतर टिम साऊदीने अश्विनला माघारी धाडले.