भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू युकी भांब्रीला चेन्नई चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील विजेतेपदासाठी अग्रमानांकित जॉर्डन थॉम्पसनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

भांब्रीने उपांत्य लढतीत दक्षिण कोरियाच्या दुकहेई ली याच्यावर ७-५, ६-२ अशी सरळ दोन सेट्समध्ये मात केली. थॉम्पसनला अन्य लढतीत बिगरमानांकित प्रेडो मार्टिनेझविरुद्ध ६-१, ७-६ असा विजय मिळवताना झगडावे लागले.

भांब्रीने ली याच्याविरुद्ध एक तास २५ मिनिटांत विजयश्री मिळवताना अचूक सव्‍‌र्हिस व बेसलाइनवरून पासिंग शॉट्स असा बहारदार खेळ केला. त्याने पहिल्या सेटमध्ये परतीचे खणखणीत फटके मारत सव्‍‌र्हिस मिळवला. त्याने लॉब्जचाही सुरेख खेळ केला. पहिला सेट घेतल्यानंतर भांब्रीचा आत्मविश्वास उंचावला. त्याने दुसऱ्या सेटमध्ये ताकदवान फटक्यांचा उपयोग केला व दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला. त्याचा फायदा घेत त्याने हा सेट सहज घेतला. त्याने एकदा आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला सव्‍‌र्हिसब्रेकची संधी दिली नाही. या विजयामुळे भांब्रीने जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली.

थॉम्पसनने मार्टिनेझविरुद्ध पहिल्या सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्याने फोरहॅण्डबरोबरच बॅकहॅण्डचाही उपयोग करीत दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला. हा सेट गमावल्यानंतरही निराश न होता मार्टिनेझने दुसऱ्या सेटमध्ये चिवट खेळ केला. त्याने प्लेसिंगचाही चांगला उपयोग केला, मात्र टायब्रेकरमध्ये त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. टायब्रेकरद्वारा हा सेट घेत थॉम्पसन याने सामना जिंकला. मार्टिनेझने उपांत्यपूर्व फेरीत महंमद शफावतवर सनसनाटी विजय नोंदवला होता.