जगभरातील ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०११च्या विश्वचषक विजयाचा शिल्पकार युवराज सिंग सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याच्या विचारात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मान्यता असलेल्या जगभरातील ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी त्याने उत्सुकता दर्शवली आहे, अशी खळबळजनक माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने रविवारी दिली.

२०१७ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन्स चषकानंतर युवराजला भारतीय संघात क्वचितच स्थान मिळाले आहे. त्याशिवाय आगामी विश्वचषकासाठीही त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच कारकीर्दीविषयी निर्णय घेण्याची शक्यता असून तो ‘बीसीसीआय’च्या परवानगीची वाट पाहत आहे, असे सूत्रांकडून समजते.

‘‘सध्या युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा विचार करत आहे. मात्र त्यापूर्वी ‘बीसीसीआय’कडून पुढील कारकीर्दीविषयी हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. कॅनडाच्या जीटी ट्वेन्टी-२०, आर्यलडच्या युरो स्लॅम यांसारख्या स्पर्धात तो खेळण्यासाठी उत्सुक आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले. ३७ वर्षीय युवराजने ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय, ५८ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले असून २००७च्या ट्वेन्टी-२० आणि २०११च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात युवराजचा मोलाचा वाटा होता.

काही दिवसांपूर्वी इरफान पठाणनेही कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी ‘बीसीसीआय’कडे परवानगी मागितली होती; परंतु इरफान अद्यापही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळत असल्याने ‘बीसीसीआय’ने त्याचा अर्ज फेटाळला. ‘‘इरफानला परवानगी नाकारण्यात आली असली तरी युवराजच्या बाबतीत आम्हाला नियमांची पडताळणी करावी लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतरही युवराजचे ‘बीसीसीआय’च्या नोंदणीकृत ट्वेन्टी-२० खेळाडूंमध्ये असलेले नाव कायम राहील,’’ असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh considering retirement
First published on: 20-05-2019 at 00:23 IST