कर्णधार युवराज सिंगसह चार अर्धशतकांच्या जोरावर भारतीय ‘ब्ल्यू’ संघाने ‘रेड’ संघावर ११ धावांनी विजय मिळवला. चार दमदार अर्धशतकांच्या जोरावर ‘ब्ल्यू’ संघाने ३४५ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया ‘रेड’चा संघ ३३४ धावांमध्ये तंबूत परतला. या विजयासह इंडिया ‘ब्ल्यू’ संघाने चार गुणांची कमाई केली आहे.
नाणेफक जिंकत ‘रेड’संघाने ‘ब्ल्यू’ संघाला फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. ‘ब्ल्यू’ संघाचा पहिला फलंदाज ३३ धावांवर तंबूत परतलेला असला तरी त्यानंतर मात्र ‘ब्ल्यू’ संघाने दमदार मजल मारली. अक्षत शेट्टी (८४), मनीष पांडे (७०), युवराज सिंग (८४) आणि धावांची टांकसाळ उघडलेल्या अभिषेक नायर (नाबाद ७५) यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारतीय ‘ब्ल्यू’ संघाला ३४५ धावांपर्यंत मजल मारता आली.
या आव्हानाचा पाठलाग करताना ‘रेड’ संघाच्या अभिनव मुकुंद (८३) आणि स्मित पटेल (नाबाद ६८) यांनी कडवा प्रतिकार केला, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. अन्य फलंदाजांची पुरेशी साथ न लाभल्याने ‘रेड’चा डाव ३३४ धावांमध्येच संपुष्टात आला. विनय कुमारने चार बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
इंडिया ‘ब्ल्यू’ : ५० षटकांत ४ बाद ३४५ (अक्षत शेट्टी ८४, मनीष पांडे ७०, युवराज सिंग ८४, अभिषेक नायर नाबाद ७५; उमेश यादव १/६७) विजयी वि. इंडिया ‘रेड’ : ४९ .५ षटकांत सर्व बाद ३३४ (अभिनव मुकुंद ८३, स्मित पटेल नाबाद ६८; विनय कुमार ४/७४).