मेलबर्न येथे होणाऱ्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाची डोकेदुखी ठरलेल्या नॅथन लायनला अखेरच्या सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. लायनसह वेगवान गोलंदाज जेसन बेऱ्हेनड्रॉफला अंतिम ११ मध्ये स्थान दिले नाही. या दोघांच्या जाग्यावर फिरकी गोलंदाज ऍडम झम्पा आणि बिली स्टॅन्लेक यांना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध खेळविण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन सामन्याच्या मालिका १-१ अशी बरोबरी केली आहे. अखेरचा सामना जिंकून मालिका विजयाचा दोन्ही संघाचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर भारताने दुसऱ्या सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली होती.

असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ :
फिंच (कर्णधार), ऍलेक्‍स केरी, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅंड्‌सकोम्ब, मार्कस स्टॉईनिस, ग्लेन मॅक्‍सवेल, जे रिचर्डसन, पीटर सिडल, ऍडम झम्पा, बिली स्टॅन्लेक.

भारतीय संघात बदल होण्याची शक्यता –
भारतीय गोलंदाज चांगलेच फॉर्मात असून भारताच्या विजयात त्यांचा वाटा मोलाचा असेल. मोहम्मद सिराज व खलील अहमद यांनी जास्त धावा दिल्यामुळे कदाचित त्यांना बसवण्यात येईल. हार्दिक पांड्याचा बदली खेळाडू म्हणून गेलेल्या विजय शंकरची संघात वर्णी लागू शकते. त्याचा समावेश केल्यास मधल्या फळीतला उपयुक्त फलंदाज म्हणूनही तो कामास येऊ शकतो. तर विकेट घेणारा गोलंदाज हा अग्रक्रम असल्यास चहलचा समावेश अंतिम अकराजणांमध्ये होण्याची शक्यता आहे. कमी धावा देऊन बळी बाद करणं हे चहलचं वैशिष्ट्य असल्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच केदार जाधवला संघात घेण्याचा पर्यायही कोहलीपुढे आहे. उपयुक्त गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा जाधवचा लौकिक असून अष्टपैलू खेळाडू घेण्यास कोहलीनं प्राधान्य दिलं तर केदार जाधव अकरा जणांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.