भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने आज दक्षिण आफ्रिकेत इतिहासाची नोंद केली आहे. महिला वन-डे क्रिकेटमध्ये २०० बळी मिळवणारी झुलन पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. भारतीय महिलांचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत झुलनने आज ही ऐतिहासीक कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्टला झेलबाद करत झुलनने वन-डे क्रिकेटमधला आपला २०० वा बळी टिपला.

सध्या सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत झुलन गोस्वामी २०० बळींसह आघाडीवर आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाची कॅथरिन फिट्झपॅट्रीक १८० बळी आणि लिसा स्थळेकर १४६ बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथा क्रमांक हा वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदने पटकावला असून अनिसाच्या नावावर १४५ बळी जमा आहेत, तर भारताची नितू डेव्हीड १४१ बळींसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे. २०११ साली न्यूझीलंडविरुद्ध खेळताना झुलनने ३२ धावांत ६ बळी घेतले होते. ही तिच्या कारकिर्दीतली आतापर्यंची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे.

या ऐतिहासीक कामगिरीनंतर अनेकांनी सोशल मीडियावर झुलन गोस्वामीचं अभिनंदन केलं आहे.