भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कितीही तणाव, दडपण असो; पण क्रिकेटच्या २२ यार्डातून या दोन्ही देशांचा सलोख्याचा राजमार्ग जातो. या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध टोकाला गेलेले असले तरी दोन्ही देशांतील बरीच सामान्य जनता एकमेकांना पाण्यात पाहत नाही, तर दोन्ही देशांतील सामान्य माणसं क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येत असतात, याचाच प्रत्यय फिरोझशाह कोटलावर होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात येणार असून पाकिस्तानचे एक हजार प्रेक्षक या सामन्याला उपस्थित राहणार आहेत.
मोहालीमध्ये विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांपासून सामान्य माणसांनी देशाची सीमा ओलांडली होती. त्यानंतर रविवारच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी एक हजार पाकिस्तानी प्रेक्षक भारतात दाखल होणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) काही अधिकारी दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला आले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या काही प्रेक्षकांना भारतातील सामना पाहायची इच्छा असल्याचे सांगितले होते. यावर दिल्ली क्रिकेट मंडळाने हजार तिकिटे त्यांना देण्याचे मान्य केले होते. ही हजार तिकिटे घेऊन पीसीबीचे अधिकारी पाकिस्तानात गेले आणि त्यावर व्हिसाची प्रक्रिया पूर्ण केली. तिकिटे मिळालेल्या चाहत्यांना व्हिसा मंजूर झाला असून ते लाहोर-दिल्ली बसने येथे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमींना भारताबद्दल आकर्षण आहे, त्यामुळे भारतात सामना पाहायला येण्याची त्यांची दुर्दम्य इच्छा असते. पीसीबीने कोलकात्यातील दुसऱ्या सामन्याच्या वेळी तसे प्रयत्न केले होते, पण त्यावेळी त्यांना वेळ कमी पडला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्याला पाकिस्तानच्या चाहत्यांना मुकावे लागले होते. पण तिसऱ्या सामन्यासाठी मात्र त्यांनी जोरदार प्रयत्न केले आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले. पत्रकार कक्षाच्या बाजूला असलेल्या स्टँडमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती एका सूत्राने दिली.

सामना हाऊसफुल्ल होणार
भारताने दुसऱ्या सामन्यासह कोलकात्यातच एकदिवसीय मालिका गमावली असली तरी फिरोझशाह कोटला रंगणाऱ्या औपचारिक तिसऱ्या सामन्यासाठी प्रेक्षक गर्दी करतील अशी शक्यता आहे. ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामन्याला आतापर्यंत  गर्दी झाली आहे. भारताने ही मालिका गमावली असली तरी या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधला सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. या सामन्याच्या निकालाला मालिकेच्या दृष्टीने महत्त्व नसलं तरी हा सामना हाऊसफुल्ल होईल’, असे दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने सांगितले.