Hyderabad Cricket Association Scam : तेलंगणा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीआयडीचा आरोप आहे की हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी असोसिएशनचे खजिनदार श्रीनिवास राव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कांते यांच्याशी हातमिळवणी करत निधीचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

तेलंगणा सीआयडीचा दावा आहे की, या प्रकरणात कथित गैरव्यवहार किमान २.३२ कोटी रुपयांचा आहे. दाखल गुन्ह्यानुसार गैरव्यवहार ६ वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी, क्रिकेट बॉल खरेदी, एअर कंडिशनर (एसी) खरेदी, स्पोर्ट्स कपडे खरेदी आणि प्लंबिंग संदर्भातील कामे, अशा प्रकारच्या खरेदीमधून हा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. तेलंगणा क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस डी. गुरुवा रेड्डी यांनी ९ जून २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सीआयडीने अटकेची कारवाई केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

काय आहेत आरोप?

वृत्तानुसार, जगन मोहन राव यांनी ‘एचसीए’च्या परिषदेतील इतरांसह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या २०२४-२५ च्या स्थानिक हंगामासाठी क्रिकेट बॉल खरेदी करण्यासाठी ही रक्कम खर्च केल्याचा दावा करत १.०३ कोटींचा गैरवापर केला. एफआयआरमध्ये म्हटलं की, “एवढ्या मोठ्या रकमेसाठी खरेदी केलेल्या बॉलची संख्या फक्त १ हजार ३४० एवढी होती.” त्यामुळे या खरेदीच्या प्रकरणात जगन मोहन राव यांनी निविदा प्रक्रियेचं उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच ११.८५ लाख रुपयांचे नवीन एअर कंडिशनर खरेदी केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. २०२३-२४ आणि २०२४-२५ च्या आयपीएलसाठी प्लंबिंग साहित्य खरेदी करताना २१.७ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तसेच २०२४-२५ च्या १८ व्या आयपीएलसाठी इलेक्ट्रिक साहित्य खरेदी करताना ६.८५ लाख रुपयांचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. तसेच २०२४-२५ च्या बीसीसीआयच्या स्थानिक हंगामासाठी कपड्यांच्या खरेदीच्या नावाखाली ५६.८४ लाख रुपयांचा गैरवापर झाल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगन मोहन राव, श्रीनिवास राव आणि सुनील कांते यांच्यावर गुन्हा दाखल करत ९ जुलै रोजी त्यांना अटक करण्यात आली आहे. २०२३ च्या एचसीए निवडणुकीच्या संदर्भात राव आणि इतर दोघांवर फसवणुकीचा आरोप करण्यात आलेला आहे. सीआयडीच्या म्हणण्यानुसार, राव यांनी निवडणुकीसाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक असलेल्या आवश्यकतांपैकी एक असलेल्या क्रिकेट क्लबचे सदस्यत्व बनावट तयार केल्याचा आरोप आहे. तसेच गौलीपुरा क्रिकेट क्लबचे दोन अधिकारी सी राजेंद्र यादव आणि जी कविता यांनाही ९ जुलै रोजी या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.