तामिळनाडूमधील विश्वा दिनदयालन नावाच्या १८ वर्षीय टेबल टेनिसपटूचा अपघाती मृत्यू झालाय. रविवारी गुवहाटीवरुन शिलाँगला येत असताना विश्वा ज्या टॅक्सीने प्रवास करत होता त्या टॅक्सीचा अपघात झाला. यामध्येच विश्वाचा मृत्यू झाल्याची माहिती टेबल टेनिस फेड्रोशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात दिलीय. १८ वर्षीय टेबल टेनिसपटूच्या आकस्मिक निधनाबद्दल केंद्रीय क्रिडा मंत्र्यांपासून तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केलाय.

विश्वा हा त्याच्या तीन संघ सहकाऱ्यांसोबत ८३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियनशीपसाठी शिलाँगला जात असतानाच हा अपघात झाला. आजपासून ही स्पर्धा सुरु होत आहे. विश्वासोबत प्रवास करणारे रमेश संतोष कुमार, अभिनाष श्रीनिवासन आणि किशोर कुमार या तिघांना गंभीर दुखापत झाली असली तरी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

“समोरुन येणाऱ्या १२ चाकी ट्रेलरने दुभाजक ओलांडून टॅक्सीला धडक दिली. शहनबंगाल येथे ही घटना घडली. या धडकेमुळे टॅक्सी दरीमध्ये कोसळली,” असं टीटीएफआयने सांगितलं आहे. या अपघातामध्ये टॅक्सी चालकाचाही जागीच मृत्यू झाला असून विश्वाला उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. नॉर्थ इस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ अॅण्ड मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरांनी विश्वाला मृत घोषित केलं.

मेघालय सरकारच्या मदतीने आयोजकांनी विश्वा आणि त्याच्या सहकाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं. विश्वा हा टेबल टेनिसमधील भावी पिढीतील आघाडीचा खेळाडू होता. त्याने अनेक पदकं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्यात. तो ऑस्ट्रियामध्ये २७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या जागतिक टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत सहभागी होणार होता. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनीही विश्वाच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केलंया. “दिनदयालन विश्वाच्या मृत्यूसंदर्भात ऐकून वाईठ वाटलं,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकूर यांनीही विश्वाच्या मृत्यूसंदर्भात ट्विटवरुन शोक व्यक्त केलाय.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ट्विटवरुन विश्वाच्या मृत्यूसंदर्भात खेद व्यक्त करताना, “एक उत्तम खेळाडू तयार होत असताना तो अशाप्रकारे आपल्यातून निघून जाणं फार खेदजनक आहे,” असं म्हटलंय.

हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी विश्वाच्या मृत्यूसंदर्भात खेद व्यक्त करताना त्याच्या कुटुंबियांसाठी पाच लाखांच्या मदतीची घोषणा केलीय.