सरलेले २०१५ हे वर्ष जागतिक क्रीडा विश्वाला बऱ्याच कडू-गोड आठवणी देणारे ठरले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाचा भ्रष्टाचारामुळे काळवंडलेला चेहरा आणि प्रतिबंधक उत्तेजक सेवनप्रकरणी रशियन अ‍ॅथलेटिकपटूंवर झालेली टीका या दोन्ही घटनांमुळे जागतिक क्रीडाक्षेत्राला मोठा हादरा बसला. तसेच पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी फ्रान्स आणि इंग्लंड यांनी आपले वैमनस्य विसरून एकमेकांविरुद्ध खेळलेल्या मैत्रीपूर्ण सामन्याने जगाला एकजुटीची शिकवण दिली. या परस्परविरोधी घटना सरत्या वर्षांचा आढावा घेताना प्रकर्षांने समोर उभ्या राहतात. क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, टेनिस, नेमबाजी, तिरंदाजी या आपल्या जिव्हाळ्याच्या खेळांमध्येही भारताची कामगिरी चढउतारांची राहिली. त्यामुळेच कटू मागे सारून चांगल्या आठवणींत रमणे अधिक महत्त्वाचे आहे.
येणारे वर्ष हे क्रीडारसिकांसाठी खमंग मेजवानी घेऊन येणारे आहे. भारतात होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक हा सर्वात रंगतदार ठरेल अशी आशा आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा सेनेला पुन्हा एकदा विश्वचषक उंचावण्याची मिळालेली ही संधीच आहे. त्यात महिला संघही इतिहास घडविण्याच्या प्रयत्नात आहेतच. पुरुष हॉकी संघाच्या गतवर्षीच्या कामगिरीचा आलेख पाहिल्यास रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न पाहणे वावगे ठरणार नाही. महिला संघानेही ३६ वर्षांनंतर ऑलिम्पिकचा उंबरठा ओलांडला आहे. बॅडमिंटनपटू, नेमबाजपटू, तिरंदाज, कुस्तीपटू, टेनिसपटूही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून इतिहास घडविण्याच्या निर्धारात आहेत. ट्वेन्टी-२० विश्वचषक, रिओ ऑलिम्पिक, युरो चषक फुटबॉल स्पर्धा या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धासह प्रो कबड्डी, प्रो कुस्ती लीग, प्रीमिअर बॅडमिंटन लीग, इंडियन सुपर लीग या राष्ट्रीय लीगच्या मेजवानीचा आस्वाद भारतीयांना २०१६ मध्ये लुटता येणार आहे. त्यामुळेच नववर्षांचे जल्लोशात स्वागत करताना भारतीय खेळाडूंकडून पराक्रमाची आशा धरू या!

010116_LS_CTI_14R