वृत्तसंस्था, दोहा : पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलला यंदाही विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार का मानले जात आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. ब्राझीलने आपला दर्जा सिद्ध करताना दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला. पूर्वार्धातील गोल धडाक्यानंतर ब्राझीलने अखेपर्यंत आपले निर्विवाद वर्चस्व राखले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात ३६व्या मिनिटालाच ब्राझीलकडे ४-० अशी मोठी आघाडी होती. व्हिनिसियस ज्युनियर (सातव्या मिनिटाला), नेयमार (१३व्या मि.), रिचार्लिसन (२९व्या मि.) आणि लुकास पाकेटा (३६व्या मि.) यांनी ब्राझीलला ही आघाडी मिळवून दिली होती. उत्तरार्धात त्यांनी खेळाचा वेग कमी केला. त्यामुळे त्यांना गोलसंख्या वाढवण्यात अपयश आले. त्यातच ७६ व्या मिनिटाला त्यांना गोल स्वीकारावा लागला. गोलकक्षाच्या बाहेरून पैक सेउंग-होच्या किकने ब्राझीलचा गोलरक्षक अ‍ॅलिसनला चकवले. उत्तरार्धात कोरियन खेळाडूंनी कामगिरी सुधारली. त्यांनी भक्कम बचाव करताना ब्राझीलच्या आक्रमकांना रोखून धरले होते. मात्र, याचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही. पूर्वार्धातील ब्राझीलच्या धडाक्याने दडपणाखाली खेळणाऱ्या कोरियाला एक गोल केल्याचा दिलासा मिळाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A dominating victory for brazil quarter finals neymar played well ysh
First published on: 07-12-2022 at 00:02 IST