पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्याच्या निकालासाठी पाकिस्तान संघाने खूप प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात पाकिस्तानने न्यूझीलंडला १३८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल पाहुण्या संघाने १ बाद ६१ धावा केल्या होत्या, मात्र खराब प्रकाशामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला. या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पत्रकाराला दिली खतरनाक रिएक्शन –

एकीकडे बाबरने पत्रकारांच्या प्रश्नांना निवांतपणे उत्तरे दिली, तर दुसरीकडे एका पत्रकाराला खतरनाक रिएक्शन दिली. त्याच्या या रिएक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरे तर बाबर पत्रकार परिषदेमधून बाहेर पडणार होता, तेव्हा एक पत्रकार ओरडला, “ही कोणतीही पद्धत नाही, इथे आम्ही प्रश्नांसाठी हातवारे करत आहोत आणि तुम्ही निघून जात आहात.”

यानंतर बाबरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि काही वेळ फक्त त्या पत्रकाराकडे नजर रोखून पाहिले. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत पत्रकाराने गोंधळात टाकणारा प्रश्न विचारल्याने बाबर यांनी ही रिएक्शन दिल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर सपशेल अपयशी –

विशेष म्हणजे बाबरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघासाठी २०२२ हे वर्ष कसोटीच्या दृष्टीने चांगले राहिले नाही. पाकिस्तानने घरच्या मैदानावर सात कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी एकही सामना जिंकला नाही. पाकिस्तानला चार कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले आणि तीन सामने अनिर्णित राहिले. पाकिस्तानचा नुकताच इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश केला होता.

हेही वाचा – BCCI Review Meeting: टीम इंडियाच्या कामगिरीचे होणार पोस्टमॉर्टम; अध्यक्ष रॉजर बिन्नीसह ‘हे’ लोक देखील राहणार उपस्थित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कराची येथे २ जानेवारीपासून सुरू होणार आहे.