IND vs PAK : जिंकलंस भावा..! मोहम्मद शमीला पाठिंबा देत आकाश चोप्रानं केलं ‘असं’, की सर्वांनीच म्हटलं Great Job

शमीला अशाप्रकारे पाठिंबा दिल्याचं पाहून सर्वांनी आकाशचं कौतुक केलंय.

aakash chopra has changed profile picture on twitter to support mohammed shami
आकाश चोप्राचं शमीला समर्थन

टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्मांध लोकांनी समाजमाध्यमांवरून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य केले. मात्र, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली. अनेकांनी ट्वीट करत या घटनेचा निषेध नोंदवला. मात्र आता माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने शमीला पाठिंबा देण्यासाठी अशी गोष्ट केली, जी फारच कौतुकास्पद ठरली आहे.

आकाश चोप्राने शमीवर होणाऱ्या निंदेनंतर आपला ट्विटर अकाऊंटचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. त्याने टीम इंडियाच्या नव्या जर्सीतील शमीचा फोटो आपला प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला आहे. या कृतीनंतर सर्वजण आकाशचे कौतुक करत आहेत.

दुबई येथे रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मानहानिकारक पराभव केला. या लढतीत शमीने ३.५ षटकांत ४३ धावा दिल्या. त्यामुळे काही जल्पकांनी त्याच्या धर्माकडे बोट दाखवून जाणूनबुजून अशी कामगिरी केल्याचा आरोप केला. काहींनी तर थेट पाकिस्तानकडून खेळण्याचे सल्ले देतानाच त्याला देशद्रोही असे संबोधले.

हेही वाचा – IND vs PAK : ‘‘वरुणच्या गोलंदाजीत काही Mystery नव्हती, पाकिस्तानातील पोरं…”; तुरुंगात गेलेला क्रिकेटपटू बरळला!

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, हरभजन सिंग, यजुर्वेंद्र चहल, अमोल मुझुमदार, रुद्रप्रताप सिंह; विख्यात समालोचक आणि विश्लेषक हर्षा भोगले, तसेच राहुल गांधी, मोहम्मद ओवेसी असा राजकारण्यांनी शमीची पाठराखण केली आहे. खेळामध्ये धर्माशी निगडित बाबी आणून खेळाडूंना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aakash chopra has changed profile picture on twitter to support mohammed shami adn

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या