एबी डिविलियर्सच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२५ स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा अंतिम फेरीत पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं. एबीने या स्पर्धेत तीन शतकं झळकावली, पण जेतेपद स्वीकारत असताना त्याने संघाबरोबर केलेल्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधलं, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना बर्मिंगहममध्ये खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान चॅम्पियन्स संघाने २० षटकांत पाच गडी गमावून १९५ धावा केल्या. डावाची सुरुवात करणारा शरजील खान सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने १७२.७२ च्या स्ट्राईक रेटने ४४ चेंडूत ७६ धावांची अर्धशतकी खेळी केली. उर्वरित फलंदाज आफ्रिकन गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसले.

दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला केलं पराभूत

आफ्रिका चॅम्पियन्स संघाने १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १६.५ षटकांतच विजय मिळवला. डावाची सुरुवात करत कर्णधार एबी डिविलियर्स उत्कृष्ट शतकी खेळी केली. त्याने ६० चेंडूत सर्वाधिक नाबाद १२० धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जीन पॉल ड्युमिनीनेही २८ चेंडूत ५० धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.

विजयानंतर आफ्रिकेच्या संघाच्या खेळाडूंनी ट्रॉफीसह फोटो काढण्यासाठी एकत्र जमले होते. यादरम्यान वेन पार्नेल आणि एबी डिविलियर्सच्या सेलिब्रेशनने सगळ्यांचं लक्ष वेधलं. सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेला आणि प्रचंड व्हायरल झालेला ‘ऑरा फार्मिंग’ डान्स करत संघाने सेलिब्रेशन केलं.

डिविलियर्स ‘चॅम्पियन्स’ लिहिलेल्या बोर्डासमोर उभा राहिला आणि ऑरा फार्मिंग व्हीडिओमधील डान्स स्टेप केल्या, त्याच्याबरोबर संपूर्ण संघानेही या स्टेप केल्या. ही स्टेप अलिकडे सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या मीम्स आणि व्हिडिओमधून प्रसिद्ध झाली आहे.

ऑरा फार्मिंग डान्स म्हणजे काय?

वेन पार्नेल पुढे उभा राहून या ऑरा फार्मिंग डान्सचं नेतृत्त्व करत होता. तर मागे उभा असलेला संपूर्ण संघ होडी पाण्यात चालवतात तसे हातवारे करत स्टेप करत होता. हा डान्स इंडोनेशियामधील “पाकू जलूर” (Pacu Jalur) नावाच्या पारंपरिक बोट रेस फेस्टिव्हलमधील एका छोट्या मुलाच्या डान्सवरून प्रेरित आहे. त्या मुलाचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.