बुद्धिबळ स्पर्धेत अभिमन्यू मिश्राचा विश्वविक्रम! १२ व्या वर्षी बनला ग्रँडमास्टर

अभिमन्यू मिश्राने बुद्धिबळ पटातील ज्युनिअर ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. यापूर्वी हा विक्रम १२ वर्षे ७ महिने वय असलेल्या सर्गेई कार्जकिन याच्या नावावर होता.

abhimanyu-mishra-1
अभिमन्यू मिश्राचा बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविक्रम! १२ व्या वर्षी बनला ग्रँडमास्टर (Special arrangement/Express)

भारतीय वंशाच्या १२ वर्षीय अभिमन्यू मिश्राने बुद्धिबळ पटातील ज्युनिअर ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. यापूर्वी हा विक्रम १२ वर्षे ७ महिने वय असलेल्या रशियाच्या सर्गेई कार्जकिन याच्या नावावर होता. त्याने हा विक्रम २००२ साली प्रस्थापित केला होता. जवळपास २० वर्षांनी न्यू जर्सीत राहणाऱ्या अभिमन्यू मिश्राने हा विक्रम मोडीत काढला आहे. सर्वात कमी वयात बुद्धिबळ पटातील ग्रँडमास्टर होण्याचा मान त्याला मिळाला आहे. हा विक्रम मोडीत काढला तेव्हा अभिमन्यूचं वय १२ वर्षे, ४ महिने आणि २५ दिवस इतकं होतं. अभिमन्यूने हा विक्रम बुडापेस्टमध्ये होणाऱ्या वेजेर्केप्जो जीएम मिक्स स्पर्धेत प्रस्थापित केला आहे. अभिमन्यूने १५ वर्षीय ग्रँडमास्टर लिओन ल्यूक मेंडोंका याला पराभूत करत हा विक्रम प्रस्थापित केला आहे.

“भविष्यातील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, ही एक चांगली सुरुवात आहे. हा विक्रम जवळपास २० वर्षांनी मोडीत निघाला आहे. एक ना एक दिवस हा विक्रम तुटणारच होता”, अशा शुभेच्छा सर्गेई कार्जकिन याने अभिमन्यूला दिल्या.


अभिमन्यूच्या विजयात त्याच्या वडिलांचा मोठा हातभार आहे. अभिमन्यूचे वडील न्यू जर्सीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. अभिमन्यूने यूरोपमध्ये जाऊन ग्रँडमास्टर स्पर्धा खेळावी, यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. “हे आमच्यासाठी एका स्वप्नपूर्तीसारखं आहे. आम्ही बॅक टू बॅक स्पर्धा खेळण्यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बुडापेस्टमध्ये गेलो होतो. माझं आणि माझ्या पत्नीचं हे स्वप्न होतं. आज हे स्वप्न पूर्ण झालं आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे.”, असं अभिमन्यूचे वडील हेमंत मिश्रा यांनी सांगितलं आहे.

IOC चा मोठा निर्णय; तान्ह्या बाळांसह महिला खेळाडूंना टोकियोत जाण्याची परवानगी

यापूर्वी अभिमन्यूने भारताच्या आर. प्रज्ञानंदचा विक्रम मोडीत काढला होता. तेव्हा त्याने तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याची किमया साधली होती. हा विक्रम त्याने १० वर्षे ९ महिने आणि २० दिवसांचा असताना प्रस्थापित केला होता. तर प्रज्ञानंदने हा विक्रम १० वर्षे १० महिने आणि १९ दिवसांचा असताना केला होता.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Abhimanyu mishra has become the youngest ever chess grandmaster in the world rmt