Asia Cup 2025 Abhishek Sharma Shaheen Shah Afridi Fight: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामना फारच अटीतटीचा होत आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताविरूद्ध ५ बाद १७१ धावांची खेळी केली. तर प्रत्युत्तरात अभिषेक शर्माने आक्रमक सुरूवात केली. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी लगावत सामन्याला सुरूवात केली. यानंतर शाहीन आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने भारताविरूद्ध अर्धशतकी खेळी करत उत्कृष्ट फलंदाजी केली आणि संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. पाकिस्तानच्या सर्व फलंदाजांनी सावधपणे फलंदाजी केली. फरहानने ५८ धावांची खेळी केली. तर फखर जमान १५ धावा आणि सईम अयुबने २१ धावांची खेळी करत आशिया चषकातील आपलं खातं उघडलं. याशिवाय फहीम अश्रफने ८ चेंडूत २० धावा करत संघाला १७१ धावांपर्यंत नेलं.
भारताला मिळालेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलची जोडी उतरली. अभिषेक शर्मा तर पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने शाहीन शाह आफ्रीदीच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. शाहीन आफ्रीदी आणि त्याच्यात बाचाबाची झाली.
अभिषेक शर्मा आणि शाहीन आफ्रीदीमध्ये बाचाबाची
अभिषेक शर्माने त्याला लगेच प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाला, “जा रे बॉल टाक..” यापुढे त्याने चांगलीच शिवीसुद्धा हासडली. अभिषेकचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय. अभिषेक आणि गिलच्या जोडीने वादळी फटकेबाजी करत पॉवरप्लेमध्येच एकही विकेट न गमावता ६९ धावा केल्या आणि संघाला दणक्यात सुरूवात करून दिली.
शुबमन गिलबरोबर भिडला आणि तोंडावर पडला आफ्रीदी
अभिषेक शर्माने षटकार लगावल्यानंतर शाहीन आफ्रिदी नाराज झाला आणि पुढच्या षटकात शुबमन गिलवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण गिलने त्याच्या चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारले. आफ्रिदी रागाने गिलला काहीतरी बोलत असल्याचे दिसून आले पण भारतीय फलंदाजाने त्याच्या चेंडूवर चौकार मारल्याचा दाखवत सीमारेषेकडे बोट दाखवलं.