घानाच्या केव्हिन-प्रिन्स बोटेंग आणि सुली मुन्तारी यांनी दुसऱ्या सत्रात केलेल्या गोलाच्या बळावर एसी मिलान संघाने चॅम्पियन्स लीगमधील अंतिम १६ जणांच्या पहिल्या फेरीच्या टप्प्यात बलाढय़ बार्सिलोनाला २-० असा पराभवाचा धक्का दिला.
सात वेळा युरोपियन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या मिलानने २०००नंतर बार्सिलोनावर मिळवलेला हा पहिला विजय आहे. या विजयासह एसी मिलानने उपांत्यपूर्व फेरीच्या आशा बळकट केल्या आहेत. ‘‘आमच्यासाठी हा संस्मरणीय विजय आहे. या सामन्यासाठी आम्ही भरपूर तयारी केली होती. खेळाडूंनी सुरेख कामगिरी घडवत हा विजय साकारला. पहिल्या सत्रात अनेक संधी वाया घालवल्या, अन्यथा यापेक्षाही मोठय़ा फरकाने आम्ही सामना जिंकला असता. आता न्यू कॅम्प येथे होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’’ असे मिलानचे प्रशिक्षक मॅसिमिलानो अ‍ॅलेग्री यांनी सांगितले.
चुरशीच्या झालेल्या पहिल्या सत्रात बार्सिलोनाने यजमान मिलानचा भक्कम बचाव अनेक वेळा भेदत गोलरक्षक ख्रिस्तियान अबिआटी याच्यावर दडपण आणले. पण १६व्या मिनिटाला बोटेंगच्या पासवर गिआमपावलो पाझ्झिनी याला मिलानला आघाडी मिळवून देण्यात अपयश आले. त्यानंतर काही मिनिटांतच बार्सिलोनाच्या प्रेडो रॉड्रिगेझची चाल मिलानचा बचावपटू फिलिप मेक्सेस याने हाणून पाडली. बोटेंगकडून मिळालेल्या पासवर स्टीफन ईल शारावी याने डाव्या बाजूने गोलक्षेत्रात पदार्पण केले. पण त्याला बार्सिलोनाचा गोलरक्षक विक्टर वाल्डेस याला चकवण्यात अपयश आले. ५६व्या मिनिटाला ख्रिस्तियाना झापाटा याच्याकडून मिळालेल्या पासवर बोटेंगने १६ मीटरवरून मारलेला फटका थेट गोलजाळ्यात गेला. त्यानंतर ८०व्या मिनिटाला मुन्तारीच्या गोलमुळे मिलानने विजयाची नोंद केली. रिकाडरे मोन्टोलिव्होने गोलक्षेत्रात बाये नियांग याच्याकडे चेंडू सोपवल्यानंतर उजव्या बाजूकडून त्याने तो ईल-शारावीकडे पास केला. शारावीने मोठय़ा शिताफीने बार्सिलोनाच्या बचावपटूंना चकवत मुन्तारीकडे चेंडू सोपवला. अखेर मुन्तारीने कोणतीही चूक न करता चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली.