द हंड्रेड स्पर्धेत खेळाडू अनेक नवनवीन विक्रम करत आहेत. एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळी आणि विक्रमांच्या दरम्यान खेळाडूला जबर दुखापत झाल्याचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. मैदानावर फिल्डिंग करत असताना अचानक खेळाडूच्या पायाचं हाड सरकलं आणि तो मैदानावर पडला. त्याच्या दुखापतीचा व्हीडिओ पाहून अंगावर काटा येईल.
शनिवारी नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथील सामन्यादरम्यान एक मोठा अपघात झाला. इंग्लंडचा फलंदाज अॅडम हॉजला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली आणि त्याचा उजवा घोटा निखळला. सामना सुमारे १० मिनिटं थांबवण्यात आला आणि मैदानावर रुग्णवाहिका बोलवावी लागली. पण ट्रेंट रॉकेट्सने सदर्न ब्रेव्हवर चार विकेट्सने विजय मिळवला.
द हंड्रेड स्पर्धेत खेळाडूला मैदानावर झाली गंभीर दुखापत
सामन्यादरम्यान, ट्रेंट रॉकेट्सचा फलंदाज अॅडम हॉजचा एक दुर्दैवी अपघात झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे सदर्न ब्रेव्ह विरुद्धच्या सामन्यादरम्यान हॉजला गंभीर दुखापत झाली. ही घटना पहिल्या डावाच्या शेवटच्या काही षटकांमध्ये घडली.
पहिल्या डावात फक्त २० चेंडू शिल्लक होते. मिड-विकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या हॉजने मायकेल ब्रेसवेलचा एक उत्तम फटका खेळलेला चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा पाय घसरला आणि त्याचा घोटा मुरगळला. पाहता पाहता त्याचा पाय अक्षरश: उलटा झाल्याचं दिसत आहे. त्याच्या पाय हाड अचानक सरकल्याने त्याला दुखापत झाली.
पायाला दुखापत होताच हॉज मैदानावर बसला आणि वेदनेने कळवळताना दिसला. यानंतर मेडिकल स्टाफ लगेच मैदानावर धावत पोहोचला. यानंतर, त्याला मैदानातून थेट रुग्णालयात नेण्यात आले. इंग्लंडमधून येणाऱ्या अहवालांनुसार त्याच्या पायाचा घोटा निखळला आहे. रविवारी, हॉजने त्याच्या पायाला पट्टी बांधलेली असतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
हॉजची दुखापत नेमकी किती गंभीर आहे, यासाठी अधिक स्कॅनची आवश्यकता असेल. घोट्याचा निखळलेला भाग बरा होण्यासाठी सहसा अनेक आठवडे लागतात. ट्रेंट रॉकेट्सने हा सामना चार विकेट्सने जिंकला. रॉकेट्सने सदर्न ब्रेव्हने दिलेले १४१ धावांचे लक्ष्य चार चेंडू आधी सहा विकेट्सच्या मोबदल्यात १४५ धावा करून पूर्ण केले.