Afghanistan Squad For Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेचा थरार येत्या ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन युएईत केले जाणार आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन देखील टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपआधी आशिया चषकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. नुकताच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर केला आहे.
आशिया चषकासाठी अफगाणिस्तान संघाच्या नेतृत्वाची धुरा अनुभवी खेळाडू राशिद खानकडे सोपवण्यात आली आहे. तर अजमतुल्लाह उमरजई आणि मोहम्मद नबीसारख्या अनुभवी खेळाडूंना देखील या संघात स्थान देण्यात आलं आहे. या संघात प्रमुख फलंदाज म्हणून इब्राहीम जादरान आणि रहमनुल्लाह गुरबाज यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांची गेल्या काही सामन्यातील कामिगिरी पाहता या जोडीकडे डावाची सुरूवात करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. या संघात संघातील सर्वात अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीचा देखील समावेश करण्यात आला आहे.
या गोलंदाजांना मिळाली संधी
वेगवान गोलंदाज म्हणून नवीन उल हकला संघात स्थान देण्यात आलं आहे. नवीन उल हकने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार गोलंदाजी केली आहे. त्याच्या नावे ६७ गडी बाद करण्याची नोंद आहे. यासह फजलहक फारूकीचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. तर फिरक गोलंदाज म्हणून या संघात कर्णधार राशिद खानसह नूर अहमद आणि अल्लाह गजनफर यांना देखील संधी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानचा पहिला सामना ९ सप्टेंबरला हाँगकाँग संघाविरूद्ध होणार आहे.
आगामी आशिया चषकासाठी असा आहे अफगाणिस्तानचा संघ:
रहमानुल्लाह गुरबाज, राशिद खान (कर्णधार) , इब्राहीम जादरान, दरविश रसूली, सेदिकुल्लाह अटल, अजमतुल्लाह उमरजई, करीम जनत, मोहम्मद नबी,मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, गुलबदीन नईब, शराफुद्दीन अशरफ, अल्लाह गजनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन उल हक, फजलहक फारूकी
राखीव खेळाडू- वफीउल्लाह ताराखिल, अब्दुल्ला अहमदजई, नांग्याल खारोटे