चेन्नई : भारत आणि इंग्लंडसारख्या संघांना जे जमले नाही, ते कोलकाता नाइट रायडर्सने करुन दाखवले. कर्णधार म्हणून पॅट कमिन्सची विविध स्पर्धांतील जेतेपदाची मालिका खंडीत करत कोलकाताच्या संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) करंडकावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले. मिचेल स्टार्कचा (२/१४) भेदक मारा आणि त्याला अन्य वेगवान गोलंदाजांची मिळालेली साथ यामुळे कोलकाताने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबाद संघावर आठ गडी आणि ५७ चेंडू राखून विजय मिळवत ‘आयपीएल’च्या १७व्या हंगामाचे जेतेपद पटकावले.

कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाला जागतिक अजिंक्यपद कसोटी (डब्ल्यूटीसी), अॅशेस आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर आता ‘आयपीएल’मध्ये जेतेपद पटकावण्याचे कमिन्सचे ध्येय होते. मात्र, अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला ‘माझी जेतेपदांची ही मालिका कधीतरी संपुष्टात येणारच आहे,’ असे कमिन्स म्हणाला होता. अखेर तेच झाले.

रविवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. मात्र, हैदराबादचे फलंदाज आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवू शकले नाहीत. हैदराबादचा संघ १८.३ षटकांत ११३ धावांतच गारद झाला. मग कोलकाताने १०.३ षटकांतच २ बाद ११४ धावांची मजल मारत जेतेपदावर कब्जा केला. कोलकाता संघाचे हे २०१२ आणि २०१४ नंतर तिसरे जेतेपद ठरले. कोलकातासाठी वेंकटेश अय्यर (२६ चेंडूंत नाबाद ५२) आणि रहमनुल्ला गुरबाझ (३२ चेंडूंत ३९) यांनी अप्रतिम फलंदाजी केली.

हेही वाचा >>>IPL 2024 Prize Money : जेतेपदानंतर कोलकाता टीम मालामाल, उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस

त्यापूर्वी, मिचेल स्टार्कसह सर्वच वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा करताना कोलकाताला अर्धी लढाई जिंकवून दिली होती. २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅककलमला बाद करताना टाकलेल्या चेंडूची आठवण करुन देत स्टार्कने पहिल्याच षटकात हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माचा (२) त्रिफळा उडवला. पुढील षटकात वैभव अरोराने ट्रॅव्हिस हेडला खातेही न उघडता माघारी धाडत हैदराबादला मोठा धक्का दिला. स्टार्कने राहुल त्रिपाठीलाही (९) फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. अंतिम फेरीच्या दडपणाखाली हैदराबादची आघाडीची फळी पार ढेपाळली. यानंतर मधल्या फळीतील एडीन मार्करम (२०), नितीश कुमार रेड्डी (१३) आणि हेन्रिक क्लासन (१६) काहीशी झुंज दिली. मात्र, कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक टप्पा राखताना हैदराबादच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद केले. सुरुवातीला स्टार्क, वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांच्यासमोर हैदराबादच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांचा निभाव लागला नाही, तर तळाच्या फलंदाजांना आंद्रे रसेलने (३/१९) माघारी धाडले.

स्टार्कने विश्वास सार्थकी लावलाच!

यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात मिचेल स्टार्कला बऱ्याच टीका-टोमण्यांना सामोरे जावे लागले. हंगामापूर्वी झालेल्या खेळाडू लिलावात स्टार्कवर कोलकाता नाइट रायडर्सने तब्बल २४.७५ कोटी रुपयांची विजयी बोली लावली. त्यामुळे तो ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला. मात्र, साखळी फेरीत त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. परंतु, त्याने आपले खरे मोल ‘प्ले-ऑफ’मध्ये दाखवून दिले. पहिल्या ‘क्वॉलिफायर’मध्ये त्याने हैदराबादविरुद्ध तीन गडी बाद केले आणि यावेळी त्याने पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडचा शून्यावर त्रिफळा उडवला होता. मग अंतिम सामन्यात त्याने हेडचा सलामीचा जोडीदार अभिषेक शर्माला पहिल्याच षटकात माघारी धाडले. यावेळीही त्याने त्रिफळा उडवण्याची किमया साधली. तसेच त्याने राहुल त्रिपाठीलाही बाद केले. या धक्क्यांतून हैदराबादचा संघ सावरूच शकला नाही.

३ तीन किंवा त्याहून अधिक वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवणारा कोलकाता नाइट रायडर्स हा तिसरा संघ ठरला आहे. याआधी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी प्रत्येकी पाच वेळा ‘आयपीएल’चा करंडक उंचावला आहे.

२ कर्णधार म्हणून ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावणारा श्रेयस अय्यर हा रोहित शर्मानंतरचा दुसरा मुंबईकर ठरला आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले आहे.

११३ सनरायजर्स हैदराबादचा संघ ११३ धावांतच गारद झाला. ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोणत्याही संघाची ही सर्वांत निचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१७च्या हंगामातील अंतिम सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाविरुद्ध मुंबई इंडियन्सला केवळ १२९ धावा करता आल्या होत्या.

२ कोलकाता नाइट रायडर्सने दुसऱ्यांदा चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर ‘आयपीएल’चा करंडक उंचावला. याआधी २०१२ मध्ये कोलकाता संघाने आपले पहिले जेतेपद याच मैदानावर मिळवले होते.

शाहरुखची उपस्थिती

अहमदाबाद येथे गेल्या मंगळवारी झालेल्या ‘क्वॉलिफायर-१’च्या सामन्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा संघमालक आणि प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, गेले तीन-चार दिवस विश्रांती केल्यानंतर शाहरुख चेन्नई येथे झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता संघाला समर्थन देण्यासाठी चेपॉक स्टेडियमवर उपस्थित राहिला. तसेच सामन्यानंतर त्याने नेहमीप्रमाणेच स्टेडियमची फेरी मारताना चाहत्यांना अभिवादन केले.

चेन्नईकरांचे हैदराबादला झुकते माप…

रविवारी अंतिम सामन्यापूर्वी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमबाहेर सनरायजर्स हैदराबाद संघाच्या चाहत्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. तसेच पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकल्यावर आणि त्यानंतर हैदराबाद संघाची घोषणा करताना मूळचा चेन्नईकर असणाऱ्या टी. नटराजनचे छायाचित्र स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आल्यानंतर प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी स्टेडियममध्ये दाखवण्यात आलेल्या माहितीनुसार, आवाजाची पातळी १०७ डेसिबल इतकी होती.

पुरस्कार विजेते

● ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) : विराट कोहली (७४१)

● पर्पल कॅप (सर्वाधिक बळी) : हर्षल पटेल (२४)

● स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : सुनील नरेन (४८८ धावा, १७ बळी)

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद : १८.३ षटकांत सर्वबाद ११३ (पॅट कमिन्स २४, एडीन मार्करम २०; आंद्रे रसेल ३/१९, मिचेल स्टार्क २/१४, हर्षित राणा २/२४) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १०.३ षटकांत २ बाद ११४ (वेंकटेश अय्यर नाबाद ५२, रहमनुल्ला गुरबाझ ३९; पॅट कमिन्स १/१८, शाहबाझ अहमद १/२२)

● सामनावीर : मिचेल स्टार्क.