बतुमी (जॉर्जिया) : बुद्धिबळविश्वातील भारताचा वाढता दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून युवा दिव्या देशमुखपाठोपाठ अनुभवी कोनेरू हम्पीनेही महिला विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे प्रथमच विश्वचषक विजेती एखादी भारतीयच असणार हेसुद्धा निश्चित झाले आहे.
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारत विरुद्ध चीन असे द्वंद्व होते. या दोनही लढतींत चीनच्या खेळाडूंना झुकते माप दिले जात होते. मात्र, भारताच्या बुद्धिबळपटूंनी उत्कृष्ट खेळ करताना बाजी मारली. नागपूरची ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ दिव्याने माजी जगज्जेत्या टॅन झोंगयीचा पारंपरिक डावातच पराभव केला होता. ‘ग्रँडमास्टर’ हम्पीला मात्र विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला. हम्पीने दोन दशकांपासूनचा आपला अनुभव पणाला लावत सर्व प्रकारच्या ‘टायब्रेकर’अंती माजी ‘कँडिडेट्स’ विजेत्या ली टिंगजीवर ५-३ अशी सरशी साधली. यासह तिने दिव्याप्रमाणेच पुढील वर्षीच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेतील स्थानही निश्चित केले. ‘कँडिडेट्स’मधील विजेती जगज्जेत्या जू वेन्जूनला आव्हान देण्याची संधी मिळवेल.
भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू अशी ख्याती असलेल्या ३८ वर्षीय हम्पीने जलद प्रकारात दोन वेळा जगज्जेतेपद मिळवले आहे. आता विश्वचषकातही अशाच कामगिरीची तिला संधी आहे.
चुरशीची उपांत्य फेरी…
अंतिम फेरी गाठण्यासाठी हम्पीला संघर्ष करावा लागला. ली टिंगजीने तिला कडवी झुंज दिली. उपांत्य फेरीत पारंपरिक प्रकारातील दोनही डाव बरोबरीत सुटल्यानंतर १५-१५ मिनिटांच्या जलद टायब्रेकरमध्ये बरोबरी कायम राहिली.
त्यानंतर १०-१० मिनिटांचा टायब्रेकर खेळविण्यात आला. यात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना टिंगजीने बाजी मारली. त्यामुळे पुढील डावात हम्पीला विजय अनिवार्य होता. या दडपणाखालीही तिने अप्रतिम खेळ केला आणि लढतीत ३-३ अशी बरोबरी साधली. ही बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी ‘अतिजलद’ टायब्रेकर झाला. यात पहिल्या डावात हम्पीने पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना टिंगजीचा धुव्वा उडवला. पुढील डावात हम्पीने तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट खेळ केला. तिने इटालियन पद्धतीने सुरुवात करत वर्चस्व राखले आणि डावही जिंकला.