पीटीआय, नवी दिल्ली

ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारत २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक असून, यासाठी यजमान म्हणून अहमदाबाद शहराची निवड निश्चित असून, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) आज होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत यजमान शहराच्या नावासह भारताच्या अंतिम बोलीला मान्यता देण्यात येईल.

या स्पर्धेच्या आयोजनाच्या शर्यतीत असलेल्या कॅनडाने यापूर्वीच माघार घेतली असल्यामुळे यजमानपदाचा मान भारताला मिळण्याची शक्यता बळावली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या एका शिष्टमंडळाने देखील भारताचा दौरा करून ‘आयओए’च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

कॅनडाच्या माघारीनंतर भारताने आयोजनासाठी कंबर कसली असून, यजमानपद मिळवण्यासाठी संपूर्ण ताकदीने बोली लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी यजमान शहराच्या नावासह ३१ ऑगस्टपूर्वी भारताला अंतिम बोली सादर करावी लागेल. यजमान शहरासाठी भारताने अहमदाबादचे नाव निश्चित केले आहे. सध्या भारत दौऱ्यावर असलेले राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे शिष्टमंडळ आता पुढील आठवड्यात अहमदाबादचा दौरादेखील करणार आहे. राष्ट्रकुल खेळाचे संचालक डॅरेन हॉल यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ अहमदाबादमधील केंद्राची पाहणी करण्याबरोबरच गुजरात सरकारशी देखील चर्चा करणार आहे.

राष्ट्रकुल क्रीडा महासंघाची सर्वसाधारण सभा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्लासगो येथे होणार असून, या सभेत २०३०च्या यजमानपदाचा निर्णय होणार आहे. यजमानपदाची विश्वासार्हता, क्रीडा केंद्राच्या सुविधा आणि प्रादेशिक आकर्षणाच्या दृष्टीने असलेली लवचीकता यावर यजमानपदाचा निर्णय अवलंबून राहणार आहे.

‘आयओए’च्या मुख्यालयात ही बैठक होणार असून, यामध्ये केवळ राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनासाठी बोली सादर करण्यास मान्यता देणे, २०२३-२४च्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणावर चर्चा आणि मंजुरी तसेच २०२४-२५च्या लेखापरीक्षणासाठी योग्य लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे या तीन गोष्टींवरच चर्चा होणार आहे.

● ‘आयओए’च्या घटना अनुच्छेद १०.१ नुसार राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे दोन सदस्य (एक महिला), दोघांनाही मतदानाचा अधिकार

● आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमधील भारताचा एक प्रतिनिधी

● खेळाडू आयोगाचे दोन प्रतिनिधी (एक महिला), दोघांनाही मतदानाचा अधिकार

● उत्कृष्ट गुणवत्तेचे आठ खेळाडू (चार महिला) प्रत्येकी एक मत

● अनुच्छेद १०.३ अनुसार राज्य, केंद्रशासित प्रदेश ऑलिम्पिक संघटना, क्रीडा नियंत्रण मंडळ आणि १०.१ मध्ये नाव नसलेल्या सहयोगी राष्ट्रीय क्रीडा महासंघातील प्रत्येकी एक सदस्य (यापैकी कुणालाही मतदानाचा अधिकार नसेल)

● अनुच्छेद १०.१ नुसार मान्यताप्राप्त ३३ राष्ट्रीय क्रीडा महासंघाची यादी ‘आयओए’ संकेतस्थळावर प्रसिद्ध.