नवी दिल्ली : एक विश्वचषक आणि दोन युरो स्पर्धा खेळाडू म्हणून जिंकल्यानंतर बार्सिलोना एफसीचा प्रशिक्षक म्हणून सुपरकोपा आणि ला लिगाचे विजेतेपद मिळविणाऱ्या स्पेनच्या शावी हर्नांडेडने चक्क भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. अर्जदारांमध्ये शावीचे नाव पाहून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) पदाधिकाऱ्यांनाच मोठा धक्का बसला. मात्र, त्याला करारबद्ध करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही असे सांगत ‘एआयएफएफ’ने त्याचा अर्जच फेटाळून लावला.

बार्सिलोनाकडून ७०० हून अधिक सामने खेळलेल्या शावीची फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट मध्यरक्षकांमध्ये गणना केली जाते. अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या भारतीय फुटबॉलमध्ये शावीने रस घेणे हीच मोठी गोष्ट असली, तरी त्याला सामावून घेण्याचे आर्थिक सामर्थ्य ‘एआयएफएफ’कडे नाही.

स्पेनमधील अनेक प्रशिक्षक आशिया आणि भारतात काम करतात. त्यामुळे आपण अधूनमधून भारतीय लीगमधील सामने पाहतो, असे शावी यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितले होते. संधी मिळाल्यावर त्याने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अर्जही केला. मात्र, त्याचा अर्ज पाहूनच चकित झालेल्या ‘एआयएफएफ’च्या पदाधिकाऱ्यांसमोर खर्चाचा डोंगर उभा राहिला आणि त्यांनी अर्ज थेट फेटाळून लावला.

‘एआयएफएफ’च्या तांत्रिक समितीने अंतिम मुलाखतीसाठी निश्चित केलेल्या नावांमध्ये यापूर्वी प्रशिक्षकपद भूषविलेल्या स्टीफन कॉन्स्टटाईन यांच्यासह स्लोवाकियाच्या स्टीफन टार्कोविच आणि भारताचा माजी खेळाडू खालिद जमिल यांचा समावेश आहे. कॉन्स्टटाईन यांनी यापूर्वी दोन वेळा भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविले आहे. मात्र, या वेळी ‘एआयएफएफ’ भारतीय उमेदवाराला संधी देण्याबाबत विचार करत असल्याचे समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्थिक अडथळा

शावीने २०२१ ते २०२४ या कालावधीत स्पेनमधील बलाढ्य फुटबॉल क्लब बार्सिलोनाचे प्रशिक्षकपद भूषविले. त्यावेळी त्याला ७५ ते ८० कोटींपर्यंतचे वार्षिक मानधन मिळत होते. दुसरीकडे, भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदापासून नुकतेच दूर करण्यात आलेल्या मानोलो मार्क्वेझ यांना ‘एआयएफएफ’कडून तीन ते चार कोटी इतके वार्षिक मानधन दिले जात होते. या तफावतेमुळेच ‘एआयएफएफ’समोर अडथळा निर्माण झाला.