मुंबई  : ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचे विजयी सलामीचे लक्ष्य असेल. पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला आता दोन महिन्यांचा कालावधी आहे. या स्पर्धेसाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कितपत सज्ज आहे याचा अंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेअंती येईल. या मालिकेला सुरुवात होण्याच्या तीन दिवसांपूर्वीच मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारची ‘एनसीए’मध्ये बदली करण्यात आली आणि ऋषिकेश कानिटकरकडे फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेत भारताला सलामीवीर स्मृती मानधनाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तिची सलामीची साथीदार शफाली वर्मा उसळी घेणाऱ्या चेंडूंविरुद्ध अडचणीत सापडते. याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज घेऊ शकतील.  संघात पुनरागमन झाल्यापासून जेमिमा रॉड्रिग्जने उत्तम खेळ केला असून कर्णधार हरमनप्रीतच्या कामगिरीतही सातत्य आहे. हरलीन देओल व यास्तिका भाटिया यांनी चॅलेंजर चषकातील कामगिरीच्या बळावर संघात पुनरागमन केले आहे. अष्टपैलू देविका वैद्यला आठ वर्षांनंतर ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळाले आहे. भारताच्या गोलंदाजीची भिस्त रेणुका सिंह ठाकूर व दीप्ती शर्मावर असेल. दुसरीकडे, एलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघात  नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. फलंदाज फोबी लिचफील्डकडून संघाला दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाज किम गार्थ व हीथर ग्राहमही संघाकडून पदार्पण करण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aim for the winning opening india australia women twenty20 series from today ysh
First published on: 09-12-2022 at 00:02 IST