नवी दिल्ली : गेल्या महिन्यात फेडरेशन चषक स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी महाराष्ट्राची ऐश्वर्या मिश्रा उत्तेजक चाचणी टाळण्यासाठी बेपत्ता झाल्याचे निष्पन्न होत आहे.

याआधी कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक न मिळवलेल्या ऐश्वर्याने कोळीकोडे येथे झालेल्या महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत ५१.१८ सेकंद ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ नोंदवून लक्ष वेधले. या स्पर्धा प्रकारात हिमा दास (५०.७९ सेकंद; राष्ट्रीय विक्रम) आणि मनजीत कौर (५१.०५ सेकंद) यांनाच आतापर्यंत सर्वोत्तम वेळ गाठता आली आहे. ऐश्वर्याच्या पराक्रमामुळे जुलैमध्ये अमेरिकेत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तिची निवडही झाली होती. पण या स्पर्धेनंतर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) आणि जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने स्थापन केलेला अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट (एआययू) यांच्याकडून ऐश्वर्याच्या चाचणीचे नमुने घेण्यासाठी शोध सुरू आहे.

ऐश्वर्याच्या दिमाखदार कामगिरीमुळे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने टर्की येथे झालेल्या विशेष तयारी शिबिरासाठी भारतीय पथकात तिला स्थान दिले. आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसह महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी ऐश्वर्याची निवड अपेक्षित मानली जात होती. परंतु या सराव शिबिराकडेही तिने पाठ फिरवली.

‘‘ऐश्वर्या ‘नाडा’ आणि ‘एआययू’च्या उत्तेजक चाचणीसाठी टाळाटाळ करीत आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ तिचा शोध घेण्यात अपयशी ठरत आहे. फेडरेशन चषकात सुवर्णपदक जिंकल्यापासून तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. संघटनेकडे नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर ‘चुकीचा क्रमांक’ असे सूचित केले जात आहे,’’ अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली.

२०१७ मध्ये निर्मलाचे पलायन

उत्तेजक चाचणी टाळण्यासाठी पलायन करणारी ऐश्वर्याही पहिलीच धावपटू नाही. ४०० मीटरमधील धावपटू निर्मला शेरॉन ही राष्ट्रीय शिबिरातून आपल्या वैयक्तिक प्रशिक्षकासह प्रदीर्घ काळ अज्ञातवासात होती. मग सापडल्यानंतर झालेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. याचप्रमाणे २०१७मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक तिला गमवावे लागले.

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय शिबिरातून वगळले

ऑक्टोबर २०१९मध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ऐश्वर्याने प्रथमच लक्षवेधी कामगिरी करताना ५२.४० सेकंद अशी वेळ नोंदवली होती. याच कामगिरीच्या बळावर टर्की येथील राष्ट्रीय सराव शिबिरासाठी तिची त्या वर्षी भारतीय पथकात निवड झाली होती. ऐश्वर्याच्या वेगाने होत असलेल्या उत्कर्षांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण २०२०मध्ये खराब कामगिरीचे कारण देत तिला राष्ट्रीय शिबिरातून वगळण्यात आले होते. मग २०२१मध्ये राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ऐश्वर्याने ४०० मीटर आणि २०० मीटरमध्ये रौप्यपदके कमावली होती. गेल्या महिन्यातील फेडरेशन चषक स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण आणि २०० मीटर शर्यतीत तिने रौप्यपदक पटकावले होते.

ठावठिकाण्याबाबत अनभिज्ञ

ऐश्वर्याच्या ठावठिकाण्याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत, असे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला आणि महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव सतीश उचिल यांनी स्पष्ट केले. कांदिवली येथील ‘साइ’च्या केंद्रात ऐश्वर्या सराव करायची. तेथील प्रशिक्षकांकडेही तिची माहिती नाही.