भारत आणि पाकिस्तान सामन्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL 2025) मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला आहे, त्यामुळे स्पर्धेच्या आयोजकांवरही टीका केली जात आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांचे दिग्गज खेळाडू रविवारी २० जुलै रोजी बर्मिंगहममधील एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर एकमेकांसमोर येणार होते. पण त्यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी माघार घेतल्याने सामना रद्द करण्यात आला आहे. यानंतर आता अजय देवगण आणि शाहीद आफ्रिदी यांचा फोटो व्हायरल होत आहे.

युवराज सिंगच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघातील काही मुख्य खेळाडूंनी पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानविरूद्ध सामना खेळण्यासाठी नकार दिला. यापैकी शिखर धवनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सामन्यातून माघार घेतल्याचं सांगितलं. यानंतर पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदी भारताविरूद्ध वक्तव्यही केलं. यादरम्यान शाहिद आफ्रिदी आणि भारताचा बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यांचा फोटो व्हायरल होत आहे. पण या फोटोमागचं नेमकं सत्य काय आहे? जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स टी-२० स्पर्धेचा सह-मालक आहे. गेल्या वर्षी, तो स्पर्धेच्या पहिल्या हंगामातील उद्घाटनादरम्यान बर्मिंगहममधील एजबॅस्टन येथे पोहोचला होता. पण आता भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर अजय देवगण आणि शाहिद आफ्रिदी छान गप्पा मारतानाचा फोटो समोर आला आहे. यामुळे भारतीय चाहते अजय देवगणवर चांगलेच संतापले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला, ज्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. यादरम्यान माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. एवढंच नाही तर शस्त्रबंदीनंतर त्याने विजयी परेड देखील काढली. शाहिद आफ्रिदीच्या अशा वागण्यानंतर अजय देवगणचं त्याच्याशी हसत खेळत बोलतानाचे फोटो पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय देवगणने शाहिद आफ्रिदीशी संवाद साधला आणि भेट घेतल्याचे फोटो खरे आहेत. पण ही भेट २०२५ मध्ये झाली नव्हती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो गेल्या वर्षी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या हंगामात एकमेकांशी बोलत असतानाचे आहेत. जेव्हा स्पर्धेचा सह-मालक अजय देवगण एजबॅस्टनमध्ये उद्घाटनासाठी पोहोचला होता. पहिल्या हंगामात भारताने पाकिस्तानचा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.