चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच निवड करण्यात आली. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे शिखर धवनसोबत रोहित शर्मा भारतीय डावाला आकार देण्याची जबाबदारी पार पाडताना दिसू शकते. दरम्यान, विराट कोहलीने आगामी सामन्यामध्ये सलामी जोडीमध्ये प्रयोग करणार असल्याचे संकेत एका मुलाखतीमध्ये दिले आहेत. विराट म्हणाला की, इंग्लडमधील परिस्थितीमध्ये रहाणे चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवू शकतो. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तो एका चांगल्या सलामवीराची भूमिका पार पाडू शकतो. विराटने सलामवीर म्हणून अजिंक्यच्या नावाला दुजोरा दिल्यामुळे आगामी स्पर्धेत रोहित आणि शिखर धवनशिवाय अजिंक्य राहणेवर भारतीय संघाच्या सलामीची जबाबदारी पडणार असल्याचे संकेत मिळतात. इंग्लडमधील परिस्थितीचा विचार करुन कर्णधार विराटने अजिंक्यला सलामीला संधी दिल्यास रोहित शर्माला अकरामध्ये स्थान मिळणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.
सध्या सुरु असणाऱ्या आयपीएलच्या स्पर्धेमध्ये अजिंक्य रहाणे पुण्याच्या संघाकडून डावाची सुरुवात करताना दिसते. मात्र, भारतीय संघाकडून खेळताना बऱ्याचदा तो मध्यफळीची मदार सांभाळताना दिसला आहे. विराटने दिलेल्या संकेतानुसार, आगामी स्पर्धेत त्याची ही भूमिका बदलल्याचे दिसू शकते. या परिस्थितीत सुरेश रैना, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्यासह धोनी मध्यफळीची जबाबदारी सांभाळताना दिसू शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) नव्या अर्थरचनेचा आराखडा मंजूर करताना भारताच्या मक्तेदारीला आव्हान देण्यात आल्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघाच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. रविवारी भारतीय संघाच्या सहभागाविषयी निर्माण झालेल्या संभ्रमाचे ढग दूर झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण बैठकीत भारतीय संघ सहभागी होणार असल्याची घोषणा करुन सोमवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. विराटच्या नेतृत्वाखालील संघात गौतम गंभीरला आणि हरभजन सिंगला मात्र स्थान मिळू शकले नाही.
