Rohit Sharma Virat Kohli Fans Slams Ajit Agarkar Video: रोहित शर्मा व विराट कोहलीच्या १६८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध अखेरच्या वनडे सामन्यात विजय मिळवला. रोहित शर्माने या सामन्यात १२१ धावांची नाबाद शतकी खेळी तर विराट कोहलीने ७५ धावांची नाबाद शानदार खेळी केली. त्यामुळे या कामगिरीनंतर रोहित-विराटने २०२७चा एकदिवसीय विश्वचषक खेळलाच पाहिजे अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. यादरम्यान रोहित-विराटच्या चाहत्यांनी चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांना थेट सवाल केला आहे, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी चांगली कामगिरी केली. दौऱ्यापूर्वी रोहित आणि विराट कोहलीबद्दल मोठी चर्चा सुरू होती. रोहित-विराट २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग असेल की नाही, याबाबतही साशंकता असल्याचे निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी म्हटलं होतं. रोहितला कर्णधारपदावरून हटवत शुबमन गिलकडे नेृतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. मोठ्या विश्रांतीनंतर दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतत होते.

आता जेव्हा ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे मालिका संपली आहे. रोहित-विराटच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर चाहत्यांनी अजित आगरकर यांनाही धारेवर धरलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये रोहित आणि विराटच्या दमदार कामगिरीचा परिणाम केवळ टीकाकारांना शांत करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची चाहत्यांनी सार्वजनिकरित्या खिल्ली उडवली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित आणि विराट कोहलीचे चाहते अजित आगरकरांची थट्टा करत आहेत. व्हिडिओमध्ये चाहते म्हणत आहेत, “आगरकर सर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने धावा केल्यात, आता काय करणार? आता रो-को ला कसं थांबवणार? खेळू द्या दोघांना २०२७चा वर्ल्डकप. अरे आगरकर सर तर पळून जातायत, रो-को ने त्यांना हादरवलं.”

चाहत्यांनी अजित आगरकरांची खिल्ली उडवण्यामागचं कारण, केवळ रोहित-विराटची ऑस्ट्रेलियातील दमदार कामगिरी नव्हती, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी संघ निवडीदरम्यान त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेली वक्तव्य देखील होती. रोहित शर्माला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्याच्या निर्णयावर चाहते केवळ संतापले आहेत.

रोहित-विराटची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

रोहित शर्मा या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या वनडे मालिकेत शतक करणारा तो एकमेव फलंदाज आहे, त्याची सरासरी १०१.०० ही इतर कोणत्याही फलंदाजांपेक्षा जास्त होती. एवढंच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक ५ षटकार लगावणारा तो भारतीय फलंदाज होता. याचबरोबर रोहित शर्मा मालिकावीर खेळाडूही ठरला.

सलग दोन डावात शून्यावर बाद झाल्यानंतरही विराट कोहली एकाच डावामुळे मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने नाबाद ७४ धावा केल्या आणि रोहित शर्मासह संघाला विजय मिळवून दिला.