Akash Deep Bowled Harry Brook Video IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाने भेदक गोलंदाजी करत इंग्लंड संघावर दबाव ठेवला आहे. इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या लंचब्रेकपर्यंत ४ विकेट्स गमावत ९८ धावा केल्या आहेत. दरम्यान आकाशदीपने जबरदस्त चेंडू टाकत हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड केलं आहे. ब्रूकसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या आकाशदीपने पुन्हा एकदा त्याची शिकार केली. ब्रूकच्या विकेटचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
बर्मिंगहम कसोटी सामन्यात १० विकेट्स घेणाऱ्या आकाशदीपला लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही. आकाशदीप पहिल्या डावात महागडा ठरला. त्यामुळे त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजीही उशिरा देण्यात आली. आकाशदीपची हॅरी ब्रूकने २०व्या षटकात चांगलीच धुलाई केली होती. पण आकाशने २२व्या षटकात त्याला त्रिफळाचीत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.
चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या जोडीने गोलंदाजीला सुरूवात केली. मोहम्मद सिराजने बेन डकेट आणि ऑली पोप यांच्या विकेट फटकावल्या. तर नितीश रेड्डीने टीम इंडियाशी वाद घातलेल्या जॅक क्रॉलीला झेलबाद करत विकेट मिळवली. यानंतर आकाशदीपला गोलंदाजीची संधी दिली.
आकाशदीप २० वे षटक टाकण्यासाठी आला. तेव्हा हॅरी ब्रूक फलंदाजी करत होता. ब्रूूकने आकाशच्या या षटकात १५ धावा करत त्याची धुलाई केली. ब्रूकने आकाशदीपच्या अखेरच्या ३ चेंडूवर मोठे फटके खेळला. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर ब्रूकने स्वीप शॉट खेळत दोन चौकार लगावले. तर अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला. ब्रूकने आकाशची चांगलीच धुलाई केली.
आकाशदीपने फटकेबाजीचा बोल्ड करत घेतला बदला
आकाशदीप २२ वे षटक टाकण्यासाठी पुन्हा आला. त्याच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रूक पुन्हा मोठा फटका खेळायला गेला. आकाशदीपच्या चेंडूवर ब्रूक गुडघ्यावर बसून पुन्हा स्वीप शॉट खेळायला गेला आणि चेंडू मारायला चुकला आणि थेट जाऊन स्टम्पसवर आदळला. आकाशदीपचा चेंडू थेट मिडल स्टम्पवर आदळला आणि बेल्स हवेत विखुरल्या. ब्रूकला काही कळण्याआधीच तो त्रिफळाचीत झाला होता. २०व्या षटकातील ब्रूकने केलेल्या फटकेबाजीचा आकाशने व्याजासकट बदला घेतला.
आकाशदीपने हॅरी ब्रूकला बर्मिंगहम कसोटीतील दोन्ही डावात बाद केलं होतं. पहिल्या डावात त्याने जेमी स्मिथबरोबर ३०० धावांची रचली होती, दरम्यान आकाशदीपने ब्रूकला त्रिफळाचीत करत संघाला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला होता. तर दुसऱ्या डावात त्याने ब्रूकला पायचीत केलं होतं.