Shubman Gill Ravindra Jadeja Reaction on Akashdeep Fifty: भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने ओव्हल कसोटीत आपल्या फलंदाजीने सर्वांनाच चकित केलं. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस नाईट वॉचमन म्हणून मैदानावर आलेल्या आकाशदीपने तिसऱ्या दिवशी झटपट फटकेबाजी करत कसोटी कारकिर्दीमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. यादरम्यान भारताच्या संपूर्ण संघाने उभं राहत त्याचं कौतुक केलं, तर कोच गंभीरही चक्क आनंदाने हसताना दिसला.
भारताने तिसऱ्या दिवशी २ बाद ७५ धावांच्या पुढे खेळायला सुरूवात केली. आकाशदीपने यशस्वी जैस्वालच्या साथीने आक्रमक फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. आकाशने पहिल्याच षटकात चौकार खेचत आपले मनसुबे जाहीर केले. जेव्हा तो २१ धावांवर होता तेव्हा जॅक क्रॉलीने स्लिपमध्ये त्याचा सोपा झेल सोडला. याचा फायदा घेत आकाशने कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. आकाशने ७० चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
आकाशदीपचं हे त्याच्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीतील फक्त दुसरं अर्धशतक होतं (प्रथम श्रेणी, लिस्ट-अ, टी-२०). याआधी त्याने रणजी सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. पण विशेष म्हणजे त्याने ओव्हलमध्ये त्याची सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये ५३ धावा केल्या पण ओव्हलमध्ये ६६ धावांची शानदार खेळी केली.
आकाशदीपचं कसोटी अर्धशतक होताच गिल-जडेजाने केला इशारा
४७ धावांवर असताना आकाशदीपने चौकार खेचत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर आकाशने जल्लोष करत त्याच्या अर्धशतकाचा आनंद साजरा केला आणि जैस्वालला मिठी मारली. आकाश अर्धशतक पूर्ण होताच संपूर्ण भारतीय संघ ड्रेसिंग रूममध्ये टाळ्या वाजवत त्याचं कौतुक करत होता. यादरम्यान गिल आणि जडेजा त्याला हेल्मेट काढण्यासाठी इशारा करत होते.
फलंदाज सहसा शतकी खेळी केल्यानंतर हेल्मेट काढतात आणि अर्धशतकानंतर बॅट उंचावतात. आकाशनेही अगदी तसंच केलं. पण नाईट वॉचमन म्हणून इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर अर्धशतकी खेळी करणं सोपं काम नव्हतं, त्यामुळेच भारतीय खेळाडू त्याला या अर्धशतकाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यासाठी सांगत होते.
आकाशदीपचं अर्धशतक पाहून गंभीरच्या चेहऱ्यावर हसू
आकाशदीपचं अर्धशतक पाहून फार कमी वेळेस हसणारे भारताचे कोच गौतम गंभीर देखील आनंदाने हसत त्याचं कौतुक करताना दिसले. समालोचकांनी देखील गंभीरचं हसू पाहून आकाशदीपने खेळलेली खेळी संघासाठी किती महत्त्वाची होती, हे सांगितलं. आकाशदीप ६९ धावांची वादळी खेळी खेळून बाद झाला.
पहिल्या सत्रात भारताने आकाश आणि जैस्वालच्या भागीदारीच्या जोरावर ३ बाद १८९ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाकडे १६६ धावांची मोठी आघाडी आहे.