नवी दिल्ली : भारताच्या अखिल शेओरानने बुधवारी नेमबाजी विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यातील स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवले. अन्य भारतीय नेमबाजांनी मात्र निराशा केली.

पहिल्या दिवशी सोनम मसकरने १० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक पटकावले होते. सलग दुसऱ्या दिवशी भारताला अखिलने पदक मिळवून दिले. मात्र, अन्य भारतीय स्पर्धकांत विशेषत: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजांनी निराशा केली. ऑलिम्पियन रिदम सांगवान २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात कांस्यपदकापासून दूर राहिली. चीनच्या नेमबाजाकडून रिदम शूटऑफमध्ये पराभूत झाली.

हेही वाचा >>>IND vs BAN: “आमचे खेळाडू अशक्त, आमच्या खेळाडूंकडे ताकद नाही…, म्हणून षटकार लगावत नाहीत”; बांगलादेशच्या कोचचं मोठं विधान

अखिलने पॅरिस ऑलिम्पिकची हुकलेल्या संधीचे दु:ख कांस्यपदक मिळवून हलके केले. जागतिक स्पर्धेतून अखिलनेच भारतासाठी ऑलिम्पिक कोटा मिळविला होता. पण, निवड चाचणीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला अंतिम संघातील स्थान गमवावे लागले होते. ‘‘मी निराशेवर मात केली आहे. लॉस एंजलिस २०२८ ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवूनच मी तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी मी कठोर मेहनत घेतली. गुडघे टेकून नेम साधण्याच्या पद्धतीत फारसे यश मिळत नव्हते. पण, अन्य दोन प्रकारात मी चांगली कामगिरी करून पदक मिळवले’’, असे अखिल म्हणाला.

हेही वाचा >>>भारत-न्यूझीलंड कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द, BCCI ने बदलली सामन्याची वेळ; दुसऱ्या दिवसाचा सामना….

अखिल ५८९ गुणांसह पात्रता फेरीत सहाव्या स्थानावर राहिला. चेन सिंगही ५९२ गुण मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. मात्र, अंतिम फेरीत चेन अपयशी ठरला. त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अखिलने ४५२.६ गुणांसह कांस्यपदक पटकावले. त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चीनच्या लियू युकुनचे आव्हान परतवून लावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारतीय नेमबाज अपयशी ठरल्या. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती आशी चोक्से ५८७ गुणांसह पात्रता फेरीत नवव्या स्थानावर राहिली. निश्चलही पात्रता फेरीतच अडखळली. तिला ५८५ गुणांसह दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पियन विजयवीर सिधू आणि अनिश भावनाला यांनी २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात निराशा केली.