एपी, पॅरिस
जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेला तिसरा मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कराझ व ग्रीसच्या नवव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत पोलंडच्या अग्रमानांकित इगा श्वीऑटेकसह अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित कोको गॉफ, चेक प्रजासत्ताकची मार्केट वोंड्रोउसोवानेही पुढच्या फेरीत आगेकूच केली.
त्सित्सिपासने चौथ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या माटेओ अर्नाल्डीवर ३-६, ७-६ (७-४), ६-२, ६-२ असा विजय मिळवला. सामन्यातील पहिला सेट त्सित्सिपासला गमवावा लागला. दुसरा सेट त्याने टायब्रेकरमध्ये सामन्यात पुनरागमन केले. यानंतर तिसऱ्या व चौथ्या सेटमध्ये त्सित्सिपासने अर्नाल्डीला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी न देता विजय नोंदवला. पुढच्या फेरीत त्याच्यासमोर अल्कराझचे आव्हान असणार आहे. अल्कराझने आपल्या सामन्यात कॅनडाच्या फेलिक्स ऑगर- अॅलिसिमेला ६-३, ६-३, ६-१ असे पराभूत केले. तिसऱ्या फेरीतील सामन्यात सातव्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडने अर्जेंटिनाच्या टॉमस मार्टिन एचिवेरीला ६-४, १-६, ६-२, ६-२ असे नमवले.
हेही वाचा >>>T20 WC 2024 : सौरव गांगुलीने राहुल द्रविडला दिला इशारा; म्हणाला, ”जेव्हा मी रोहित-कोहलीच्या पत्नीला पाहतो तेव्हा…”
महिला एकेरीत श्वीऑटेकने अनास्तासिया पोटापोवाला ६-०, ६-० असे नमवले. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना श्वीऑटेकने अनास्तासियाला एकही गेम जिंकू दिला नाही. अन्य सामन्यात, कोको गॉफने इटलीच्या एलिसाबेटा कोकिआरेट्टोला ६-१, ६-२ असे नमवत आगेकूच केली. तर, वोंड्रोउसोवाने सर्बियाच्या ओल्गा डॅनिलोविचवर ६-४, ६-२ असा विजय नोंदवला.
बोपण्णा-एब्डेन जोडीची आगेकूच
भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एब्डेन जोडीने पहिल्या फेरीत ब्राझीलच्या ओरलँडो लूज व मार्सेलो जोरमन जोडीला पराभूत करत दुसरी फेरी गाठली. बोपन्ना व एब्डेन जोडीने ब्राझीलच्या जोडीवर ७-५, ४-६, ६-४ असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत त्यांच्यासमोर ब्राझीलच्या थिआगो सेबोथ वाइल्ड व अर्जेंटिनाचा सॅबेस्टियन बाएझ जोडीचे आव्हान असेल.
जोकोविचचा संघर्षपूर्ण विजय
अग्रमानांकित सर्बियाचा आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने चौथ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, त्यासाठी जोकोविचला संघर्ष करावा लागला. जोकोविचने पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात इटलीच्या लॉरेंझो मुसेट्टीला ७-५, ६-७ (६-८), २-६, ६-३, ६-० असे नमवले. जोकोविचने पहिला सेट जिंकत चांगली सुरुवात केली. मात्र, मुसेट्टीने नंतरचे दोन सेट आपल्या नावे करत आघाडी मिळवली. जोकोविचने अखेरच्या दोन सेटमध्ये पुनरागमन करत विजय नोंदवला.